scorecardresearch

पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी

चाचणीचा कार्यक्रम संपल्यावर लगेचच २४९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा २०२१ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी घेतल्यानंतर लगेचच २४९ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली असून, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी (ऑप्टिंग आऊट) १० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे :डाॅ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर; साधना बहुळकर यांना ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शासन सेवेतील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेऊन २३ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात आला. त्यात शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या १ हजार ३१ उमेदवारांची चाचणी डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली. चाचणीचा कार्यक्रम संपल्यावर लगेचच २४९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या प्रकल्पांना ‘राष्ट्रवादी’कडून खोडा; भाजपाचा आरोप

सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या प्रवेश अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम पडताळणीअंती काही उमेदवारांच्या शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणातील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. काही उमेदवारांवर प्रतिरोधित करण्याची कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 23:56 IST

संबंधित बातम्या