पुणे : हातउसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दौंडमध्ये तिघांवर शासकीय रिव्हाॅल्व्हरमधून गोळीबार करून खून करणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) पोलीस उपनिरीक्षकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी जन्मठेप आणि तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

संजय बळीराम शिंदे (रा. गोपाळवाडी ररस्ता, सरपंचवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दौंड शहरातील नगरमोरी चौकात १६ जानेवारी २०१८ रोजी शिंदे याने केलेल्या गोळीबारात गोपाळ काळुराम शिंदे (वय ३४, रा. भवानीनगर, ता. दौंड), परशुराम गुरुनाथ पवार (वय २८, रा. वडारगल्ली, दौंड), अनिल विलास जाधव (वय ३४, रा. जिजामाता नगर, लिंगाळी, ता. दौंड) यांचा मृत्यू झाला होता. याबाबत गजानन काळुराम शिंदे (वय ३२, रा. देवकीनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपी संजय शिंदे हा राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) उपनिरीक्षक होता. त्याने किरकोळ वादातून तिघांवर गोळ्या झाडून खून केला. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तिघांना लहान मुले होती. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे हे आरोपीचे काम होेते. उपनिरीक्षक असणाऱ्या शिंदेने किरकोळ वादातून त्याने तिघांचा खून केला. त्याच्या कृत्यामुळे मुलांचे पितृछत्र हरपले. कारागृहात शिंदे याची वर्तणूक चांगली नव्हती. समाजात कायद्याचा वचक राहावा, यासाठी आरोपी शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी युक्तिवादात केली होती. आरोपीला तीन लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. दंडाच्या रकमेपैकी ८० टक्के रक्कम मृतांच्या नातेवाइकांना देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले.

या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून ३२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, शस्त्रास्त्र तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली.

घटना काय होती?

गोपाळ हे फिर्यादी गजानन यांचे भाऊ असून, परशुराम हे मेहुणे आहेत. हातउसने घेतलेले पैसे परत करण्यावरून गोपाळ शिंदे आणि संजय शिंदे यांच्यात वाद झाले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गजानन हे त्यांच्या मेहुणा परशुरामसह घटनास्थळी आले होते. या वेळी गजानन यांनी मध्यस्थी केली. मी पैसे देतो असे सांगून गोपाळ आणि परशुराम यांना घरी जाण्यास सांगितले. या वेळी उपनिरीक्षक संजय याने गोपाळवर रिव्हाॅल्व्हरमधून गोळी झाडली. त्यानंतर त्याने परशुराम यांच्यावरही गोळी झाडली. त्यानंतर संजयने रिव्हाॅल्व्हर दुचाकीच्या डिक्कीत ठेवले, तो दुचाकीवरून दौंडच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर गोपाळ आणि परशुराम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संजय हा त्याचा मित्र अनिल जाधव याच्या घरी गेला. घराबाहेर अनिल यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेतून मध्यरात्री साक्ष

गोळीबार करून आरोपी संजय शिंदे हा नगरकडे निघाला होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून रिव्हाॅल्व्हर, काडतुसे आणि दोन मॅग्झिन जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही घटनास्थळांची पाहणी केली. तेथून दहा पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. घटनास्थळी सापडलेल्या पुंगळ्या शस्त्रात्र तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्या. सध्या अमेरिकेत वातव्यास असलेल्या शस्त्रास्त्र तज्ज्ञाची साक्ष अमेरिकेतून मध्यरात्री दोनच्या सुमारास व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे नोंदविण्यात आली. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते. तेव्ही ही साक्ष नोंदविण्यात आली होती.