प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रस्ता, ससून हॉस्पिटल
महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभाग क्रमांक २० म्हणजे ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल या प्रभागात विविधभाषी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जातीच्या समीकरणावरच उमेदवारांची निश्चिती होण्याची येथे शक्यता आहे. उमेदवार ठरवताना प्रमुख पक्षांकडून हीच बाब लक्षात घेतली जाण्याचीही शक्यता आहे. मुळातच ‘कॉस्मोपॉलिटन’ अशी या प्रभागाची ओळख असल्यामुळे या प्रभागात उमेदवारी देताना त्याच मुद्याचा विचार होईल.
ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल या परिसरात काँग्रेसचे प्राबल्य आहे. ताडीवाला रस्ता, लडकतवाडी, साधू वासवानी चौक, सोमवार पेठ, भवानी पेठ, राजेवाडी यासारखा काही भागाचा या प्रभागात समावेश करण्यात आला आहे.
बौद्ध, मुस्लीम, मातंग, चर्मकार आणि मेहतर समाजही या प्रभागात मोठय़ा संख्येने आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड आणि काँग्रेसच्या नगरसेविका लता राजगुरू यांचा जुना प्रभाग या नव्या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रभागात काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. प्रभागात काँग्रेसचे प्राबल्य असले तरी मध्यंतरीच्या कालावधीत या प्रभागात काही राजकीय घडामोडी घडल्यामुळे प्रभागातील परिस्थितीही बदलली आहे. शिवसेना आणि भाजपसह मनसेकडूनही या प्रभागात जोरदार हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेसपुढे हे पक्ष आव्हान निर्माण करू शकतील, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदेव गायकवाड यांचा मुलगाही या प्रभागातून इच्छुक असून माजी आमदार कमल ढोले-पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीही या प्रभागातून उमेदवार असेल, अशी चर्चा आहे.
प्रभागातील रिपब्लिकन पक्षाचे वाढते प्राबल्य लक्षात घेऊन भारीप बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष आणि बौद्ध समाजातील उमेदवारांचे एकत्रिकरण करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या असल्याची चर्चा आहे. प्रभागातील ही धार्मिक आणि जातीय गणितं लक्षात घेऊनच महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवार निश्चिती होणार आहे.