भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रश्न

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला होता, हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला, अशी विचारणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे केली. सत्ता स्थापनेचा प्रस्ताव नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवारांचा नाही, असेही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर ‘लोकसत्ता’ने तयार केलेल्या ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर झालेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्यात राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देण्यात आला होता ही गोष्ट प्रथमच जाहीर केली. तसेच विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात नेतृत्वाविषयी जे ठरले होते ते पाळले न गेल्याने ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांच्यातील वाढलेली दरी आमच्यासाठी संधी होती, ती आम्ही साधली. त्यामुळे राज्यातील सरकार भाजपच्या कृपेने आहे, असेही पवार म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, हे सांगायला एवढा वेळ का लागला. मोदी आणि पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय बोलणे झाले हे कळणे अवघड आहे. पण असा प्रस्ताव असता तर तो नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवार यांच्यात मुळीच नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर वाढविण्याच्या कामाची शरद पवार यांनी जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतरही शिवसेनेला पवार यांच्याबद्दल प्रेम वाटत असेल, तर ते शिवसेनेला लखलाभ होवो, असा चिमटा त्यांनी शिवसेनला काढला.