पिंपरी : वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात ११ जानेवारी २०२३ शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते. हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली. त्यामुळे सर्दी, खोकला, दम लागणे आदींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. त्यातून बारीक कण हवेत मिसळत आहेत. तसेच बांधकाम क्षेत्रातील धुळही वाढत आहे. परिणामी, सध्या प्रदूषित हवेचा श्वास नागरिक घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये यंत्रणा बसविली असून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडसाठी पुनावळेत कचरा भूमी होणारच; महापालिका आयुक्तांनी घेतली ‘ही’ भूमिका

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोसरी चौक, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे वस्ती, होळकर चौक, नेहरूनगर चौक, मोशी गोडाऊन चौक, चिंचवड येथे हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आकुर्डी खंडोबा चौक, नाशिक फाटा, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवडगाव चौक, रावेत-भोंडवे चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एमएए स्कूल चौक या चौकात ‘मिस्ट फाऊंटन’ बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये जैव वैद्यकीय कचरा टाकला जातोय रस्त्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरवासीयांना शुद्ध हवा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महत्त्वाच्या नऊ चौकांमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे.- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग