पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब नोंदवला आहे, अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी आज दिली. त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना आता क्लिनचीट मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढच नाही तर संजय राठोड यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, ”पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. मी त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नाही. पुणे पोलिसांवर दबाव असण्याचं काही कारण नाही. ते त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी कोणाला अहवाल दिला. या संदर्भात मला काही माहिती नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुणे पोलीस करीत आहे. तपास पूर्ण झाल्यावर त्याबद्दल सांगता येईल. अहवाल येण्यापूर्वीच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.”

“आमची कोणा विरुद्ध काही तक्रार नाही”; पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवला जबाब!

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे, राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे बोलले गेले. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे.