पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नेमणुकीस असताना अनेक विभागांतील प्रशिक्षणाला दांडी मारल्याचे उघडकीस आले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या विभागांमध्येही त्यांनी गैरवर्तन केल्याचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा, जिल्हा नियोजन शाखा, पुरवठा शाखा, सर्वसाधारण शाखा, लेखा शाखा, कुळकायदा शाखा, पूनर्वसन शाखा, खनिकर्म शाखा, भूसंपादन समन्वय शाखा, संजय गांधी निराधार योजना शाखा, गृह शाखा आदी कार्यालयांमध्ये १४ जूनपर्यंत प्रशिक्षण घेण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. काही शाखांमध्ये दोन दिवस, काही ठिकाणी एक दिवस, तर काही शाखांमध्ये अर्धा-अर्धा दिवस असे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, यांपैकी काही विभागांमध्ये खेडकर यांनी प्रशिक्षण घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. खेडकर यांनी प्रशिक्षण घेतलेल्या विभागांच्या प्रमुखांनी दिलेल्या अहवालात त्यांची वर्तवणूक चांगली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, माहिती खोडून काढणे, प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणे, तसेच दिलेल्या सेवांचा गैरवापर करणे असे अहवालात म्हटले आहे. संबंधित अहवाल जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्याकडे देण्यात आले आहेत.

हेही वाचा – युजीसी करणार उच्च शिक्षण संस्थांवर कारवाई… प्रकरण काय?

रुजू होण्यापूर्वीच सुविधांसाठी तगादा

खेडकर यांनी ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर १५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. ३ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी सुरू होण्यापूर्वीच म्हणजे एक आठवडाभरापासून २० मे पासून जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन, शासकीय निवासस्थान, कार्यालयात स्वतंत्र दालन आणि शिपाई आदी व्यवस्था करून ठेवण्याबाबत अगोदरच भेटी देऊन, व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता. जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी असल्याने खेडकर यांना काही सुविधा पुरविल्या.

हेही वाचा – IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना पुणे महापालिकेची नोटीस, घराबाहेरील अनधिकृत बांधकाम न काढल्यास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३० जुलै २०२५ पर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन

१८ ते २१ जून (एक आठवडा) विभागीय आयुक्तालय, २४ ते २६ जून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, २७ आणि २८ जून असे दोन दिवस जिल्हा न्यायालय, त्यानंतर १ ते ५ जुलै जिल्हा कोषागार कार्यालय आणि पुढील इतर सर्व शासकीय शाखा, आस्थापना, कार्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी ३० जुलै २०२५ पर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन होते. मात्र, जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षणानंतर गैरवर्तणुकीमुळे पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना राज्य शासनाकडून वाशिम जिल्ह्यात पाठविण्यात आले.