पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील चिखलमय आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. यामुळे आयटी पार्क परिसरात सातत्याने अपघात घडून अनेक जणांचा जीवही गेला आहे. या परिसरात अनेक मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्याचा राडारोडा रस्त्यांवर पसरत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे.
या वर्षी हिंजवडी परिसरात रस्ते अपघातात एकूण अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. रहिवाशांच्या मते, हे अपघात नसून वाहतूक नियोजनाचा अभाव, जड वाहनांवरील नियंत्रणाची कमतरता आणि प्रशासनाची बेपर्वाई यामुळेच हे बळी जात आहेत. स्थानिकांनी सांगितले की, हिंजवडीतील आयटी पार्क, निवासी प्रकल्प आणि शाळांच्या परिसरातून सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी रहदारी जास्त असतानाही जड वाहने धावतात. अनेक ठिकाणी पदपथच नाहीत अथवा ते बांधकाम साहित्याने अडवलेले आहेत. वेगमर्यादेचे कोणतेही पालन होत नाही. वाहतूक पोलिसांची उपस्थितीही अपुरी आहे.
खासदार सुळेंची सरकारकडे मागणी
आयटी पार्क मधील टप्पा-३ परिसरातील मेगापोलिस सॅफ्रन भागात चिखलमय व खड्ड्यांनी भरलेले रस्ते गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहेत. या धोकादायक परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आवाज उठवला आहे. खासदार सुळे यांनी समाज माध्यमावर अपघाताचे व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, हिंजवडी टप्पा-३ येथील मेगापोलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची चिखलामुळे अतिशय दुरवस्था झाली आहे. याठिकाणी रस्त्याच्या परिस्थितीमुळे आत व यापूर्वीही छोटे-मोठे असे अनेक अपघात घडले आहेत. येथील नागरिकांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आदी आस्थापनांकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. या रस्त्यांवरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, कृपया सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी.
११ वर्षांच्या मुलीचा बळी
या पार्श्वभूमीवर सुळे यांनी नुकतीच प्रत्युषा संतोष बोराटे (वय ११) या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. प्रत्युषाचा १२ ऑगस्टला दुर्दैवी मृत्यू झाला होता. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला चिरडले होते. हा अपघात घडला त्यावेळी जड वाहनांना प्रवेशबंदी होती. कुटुंबीयांनी यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित विकासक यांना जबाबदार धरले आहे.
नागरिकांच्या मागण्या
निवासी आणि शाळांच्या परिसरातून जड वाहनांना सक्त मनाई करावी.
पदपथ मोकळे करून त्यावर पादचारी मार्ग निश्चित करावा.
अपघातप्रवण ठिकाणी वेग मर्यादा), सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांची कायम नियुक्ती करावी.
अपघात करणाऱ्या वाहनचालकांसोबतच अशा वाहनांना परवानगी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी.