पिंपरी : मागील चार दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न निर्माण झाले आहे.
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. सोमवार, मंगळवार, बुधवारी पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. जलमय झालेल्या रस्त्यांवरील पाणी ओसरले मात्र पावसाचा मारा आणि बराच वेळ साचलेले पाणी यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत आहेत.
दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पदपथांवरही खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉक डळमळीत झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडलेले दिसून येत आहेत.
तीन हजार खड्डे
शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. आत्तापर्यंत या रस्त्यांवर तीन हजार ११२ खड्डे आढळले आहेत. त्यापैंकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने एक हजार २६, बीबीएमने २२४, खडीने ७२४, पेव्हिंग ब्लॉकने २३३, सिमेंट काँक्रिटने ३४६ असे दोन हजार५५३ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ८१.०७ टक्के आहे. शहरातील केवळ ५५९ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येत आहेत.
रस्त्यांवरील खडीमुळे अपघात
खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यांवरील खडीमुळे दुचाकी घसरुन अपघाताच्या घटना घडत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीची गती कमी होऊन कोंडीत भर पडत आहे. निगडी ते पिंपरी या सेवा रस्त्यांवरील खड्यांमुळे दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे.
शहरातील संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत. चार दिवसांच्या पावसामुळे खड्यांमध्ये भर पडली. गणेशोत्सावाला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेने खड्डे बुजवावेत. पिंपरी ते निगडी सेवा रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडले असून ते तातडीने बुजविण्यात यावेत. खड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.- विशाल काळभोर,आकुर्डी
पावसामुळे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याचे काम वेगात सुरु आहे. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व खड्डे बुजविले जातील.- देवन्ना गट्टूवार,सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका