PMC Road Department Complaint : शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेकडे करण्यासाठी पथ विभागाने तयार केलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपवर आठ दिवसांतच खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. ॲप सुरू झाल्यापासून या ॲपवर तब्बल ४५४ तक्रारी आल्या आहेत. यापैकी ३८९ तक्रारींची दखल घेत महपालिकेकडून त्या सोडविण्यात आल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत हे खड्डे बुजविले जात असल्याचे महपालिकेच्या पथ विभागाकडून स्पष्ट केले जात आहे. खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी पथ विभागाने पथके नेमली असून कनिष्ठ अभियंत्यांकडे रस्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या खड्डे दुरुस्तीच्या कामाचा दर्जा समोर आला आहे. पथ विभागाने दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत. खड्ड्यांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामधून वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

महापालिकेच्या पथ विभागाने यापूर्वी दुरुस्त केलेल्या खड्ड्यांमधील खडी बाहेर येत असून रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने किरकोळ अपघात देखील घडत आहेत. शहरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी सांडपाणी वाहिनी तसेच ड्रेनेज लाईनची कामे करण्यासाठी अनेक भागांतील रस्ते खोदले होते.

काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करताना योग्य पद्धतीने करण्यात न आल्याने सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या पथ विभागाने केलेली रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली असून, त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे लक्षात येताच तेथे महापालिकेच्या वतीने डागडुजी करून खड्डे बुजविले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. आतापर्यंत महापालिकेने खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी सुरू केलेल्या ॲपवर विविध भागांतून ४५४ तक्रारी आल्या आहेत. यापैकी ३८९ तक्रारींची दखल घेत त्याचे निवारण महापालिकेने केले आहे. तर ६५ तक्रारींवर काम सुरू असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी सांगितले.

तक्रार आल्यानंतर महापालिकेची यंत्रणा तसेच संबंधित अधिकारी त्याची दखल घेत कमीतकमी वेळेत तक्रारींचे निवारण कसे होईल, याकडे लक्ष देत असल्याचे पावस्कर यांनी सांगितले.