हिंडवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांना लागलेले ग्रहण सुटता सुटेना. बराच काळ पाचवीला पुजलेल्या वाहतूक कोंडीने आधीच त्रस्त आयटीयननी यंदाच्या पावसाळ्याच्या तोंडावर जलकोंडीचा अनुभव घेतला. दीड लाख कर्मचारी आणि एक लाख कोटींची निर्यात करणाऱ्या या ‘लाख’मोलाच्या परिसरातील समस्यांचा तिसरा अंक आहे विजेच्या लपंडावाचा. पाव शतकापूर्वी भविष्याचा वेध घेऊन उभ्या राहिलेल्या या आयटीनगरीचे वर्तमान मात्र ‘अंधकारमय’ आहे.
आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. त्यातच यंदा पावसाच्या पहिल्याच काही जोरदार सरींनी आयटी पार्कचे वॉटर पार्क करून टाकले. आता त्याचे ‘अंधार’ पार्क झाले आहे. ‘महापारेषण’च्या इन्फोसिस-पेगॅसस या वीजवाहिनीचा पुरवठा हिंजवडीनजीक रविवारपासून खंडित झाला. त्याचा फटका पिंपरी आणि मुळशी विभागातील ५२ हजार निवासी व औद्योगिक ग्राहकांना बसला. यात आयटी पार्कचाही समावेश आहे. हा पुरवठा सोमवारी पहाटे निवासी भागात सुरळीत करण्यात आला. मात्र, औद्योगिक भागात प्रत्येकी पाच तास चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. टीसीएस, डीएलएफ, आयबीएम, टेक महिंद्रा, कॉग्निझंट, विप्रो यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा या भागात समावेश आहे.
आयटी पार्कमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने रस्त्यांवरील सिग्नलही बंद झाले. यामुळे आयटी पार्क परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. विप्रो सर्कल ते क्वाड्रन या दरम्यान वीजवाहिनीचे काम पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. यामुळे या भागातही आगामी काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज, महाराष्ट्र या संघटनेने कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याची मागणी केली आहे.
फोरमचे अध्यक्ष पवनजित माने म्हणाले, ‘आयटी पार्कमधील टप्पा दोन व तीनमध्ये सुमारे दोन लाख कर्मचारी काम करतात. त्या भागात वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी घरून कामाची घोषणा करावी. यामुळे कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन प्रवासाचा वेळ वाचेल.’
वीज पुरवठा खंडित झाल्याने आयटी पार्कमधील टप्पा दोनमधील सिग्नल यंत्रणा बंद पडली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी १० जुलैपर्यंत रस्त्यांवर २४ तास कर्मचारी तैनात केले आहेत. याचबरोबर महापारेषणच्या कामाला गती मिळावी, यासाठीही मदत केली जात आहे. आयटी पार्कमधील टप्पा दोनऐवजी माणमार्गे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर वाहनचालकांनी करावा.
– शंकर सालकर, मुख्य कार्यपालन अधिकारी, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन
आयटी पार्क परिसरातील गृहनिर्माण संस्थांचा वीजपुरवठा रविवारपासून खंडित आहे. यामुळे पाण्याचे पंपही बंद आहेत. अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये जनित्र नसल्याने त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास कोणतीही पर्यायी यंत्रणा सध्या आपल्याकडे नाही.
– रवींद्र सिन्हा, समन्वयक, हिंजवडी रेसिडंट्स वेलफेअर असोसिएशन
हिंजवडी, माण-मारुंजी परिसरात अनेक ठिकाणी अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या परिसरातील लाइफ रिपब्लिक टाउनशिप, टिन्सेल काउंटी, कोहिनूर कोरल, ३२ पाइनवूड ड्राइव्ह आदी सोसायट्या, तसेच भोईरवाडी, माण येथे गेल्या ३० तासांपासून वीज नाही. परिणामी पाणीपुरवठा, लिफ्ट आदी सुविधा बंद आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशी गैरसोय होणे खेदजनक आहे. माझी महावितरणला विनंती आहे की कृपया या भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. – सुप्रिया सुळे</strong>, खासदार, राष्ट्रवादी (शरद पवार)
बिघाड कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी (९ जुलै) दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. – विठ्ठल भुजबळ, अधीक्षक अभियंता, महापारेषण
राजीव गांधी आयटी पार्कमध्ये…
मोठ्या कंपन्या : १५०
एकूण कर्मचारी : ३ लाख पुण्यातून सॉफ्टवेअर निर्यात (२०२३-२४) : १ लाख ५ हजार ८१८ कोटी रुपये