दुकाने, फर्म, कारखाने हे त्यांच्या नावाने ओळखण्यापेक्षा ते चालविणाऱ्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काळात आकर्षक पाटय़ा तयार करण्याचा व्यवसाय सुरू करणे हे अवघड काम होते. पत्रा, कापड यांच्यावर चित्रे रंगविण्यापासून या व्यवसायाला सुरुवात झाली. पुढे लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकानांच्या साइन बोर्डची कामे या व्यवसायाला मिळाली. कामाच्या उत्तम दर्जामुळे चहूबाजूने विस्तारणाऱ्या पुणे आणि परिसरातील विविध कंपन्यांचीही कामे पुढे येत गेली आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश सर्व कंपन्यांच्या साइन बोर्ड आणि त्या बरोबरच अंतर्गत सजावटीचीही कामे याच व्यवसायाला मिळाली. गेल्या ८५ वर्षांतील वाटचालीत प्रभात पेंटिंग वर्क या व्यवसायाने पाटय़ांच्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे. साइन बोर्ड तयार करण्यासारख्या एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करून पुण्यासह, महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यांमध्ये प्रभातची कामे सुरू आहेत.

प्रभात पेंटिंगचे संस्थापक काशिनाथ ऊर्फ दादासाहेब नारायण भंडारे यांना चित्रकलेची विशेष आवड होती. चित्रकार असल्याने विविध चित्र, तैलचित्र ते आवडीने काढायचे. या आवडीमधूनच साइन बोर्डचा व्यवसाय सुरू करावा, असे त्यांच्या मनात आले आणि १९३२ साली प्रभात पेंटिंग वर्कची स्थापना त्यांनी केली. व्यवसायाची सुरुवात खूपच खडतर होती. कारण त्या काळात दुकाने, कारखाने यांच्या पाटय़ांना विशेष महत्त्व नव्हते. त्यामुळे फारसे काम मिळायचे नाही. दादासाहेब चित्रकार असल्याचे माहीत असल्याने चित्र काढून देणार का?, पत्र्याचे बोर्ड रंगवून देणार का? अशी विचारणा व्हायची. कापडावर चित्र रंगविण्याची कामे यायची, अशी सुरुवातीची परिस्थिती होती. कामे कमी मिळत असली तरी देखील दादासाहेबांनी चिकाटी कायम ठेवत येईल ती कामे नेटाने सुरू ठेवली.

व्यवसाय सुरू केला त्या काळी पत्रा, कापडी बोर्ड यांची चलती होती. त्यानंतर निऑन साइन बोर्ड, त्याकरिता लागणारे ट्रान्सफॉर्मर, अ‍ॅक्रेलिक लेटर, मेटल लेटर, ग्लोसाइन बोर्ड विशेष प्रसिद्ध झाले. आता फ्लेक्स पेंटिंग, एलईडी यांना सर्वाधिक मागणी आहे. अशी स्थित्यंतरे व्यवसायात होत गेली. दादासाहेबांबरोबरच त्यांचे बंधू माधव भंडारे हा व्यवसाय पाहायचे. त्यांच्यानंतर चंद्रशेखर आणि त्यांचे चुलत बंधू श्रीवल्लभ हे आता हा व्यवसाय सांभाळतात. फर्निचर तसेच बँका, मोठय़ा कंपन्यांचे इंटिरिअर डिझाइन करणे अशी कामेही फर्मकडून केली जातात. त्याचा वेगळा विभागच करण्यात आला असून हे काम श्रीवल्लभ पाहतात. तर, उत्पादन विभागामध्ये देखरेखीचे काम चंद्रशेखर पाहतात.

फर्म सुरू केल्यानंतर साइन बोर्ड हा आतासारखा महत्त्वाचा घटक मानला जात नव्हता. त्याकरिता वेगळा खर्च करण्याची मानसिकता व्यापारी, दुकानदारांची नसायची. स्वातंत्र्योत्तर काळात व्यापारी, दुकानदार, बँका, फर्म, कंपन्या यांना इंटिरिअर चांगले हवे, नावाच्या पाटय़ा चांगल्या हव्या याची जाणीव व्हायला लागली आणि प्रभात पेंटिंगला कामे मिळत गेली. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता यांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न केल्याने हळूहळू कामाची व्याप्ती वाढत गेली. स्वातंत्र्यपूर्व काळातच लक्ष्मी रस्त्यावर बाजारपेठ विस्तारत गेली. अनेक दुकाने नव्याने दाखल होऊ लागली आणि प्रभातकडे साइन बोर्डसाठी मागणी येऊ लागली. त्या काळी लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकानांची कामे प्रभातने केली आहेत. त्यानंतर १९९० ते २००० या काळात पुणे शहर चहूबाजूने विस्तारत गेले. त्या काळात विविध कंपन्या आपले बस्तान बसवत होत्या. त्या कंपन्यांकडून साइन बोर्डकरिता मागणी होऊ लागली. पुण्यात नव्यानेच दाखल झालेल्या कंपन्यांची कामे केल्यानंतर या कंपन्यांच्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर ठिकाणी असलेल्या शाखांमधूनही कामांसाठी बोलावणे येऊ लागले. या फर्मने अहमदाबाद, राजकोट, मध्य प्रदेशात जाऊन कामे केली आहेत. कामातील गुणवत्ता ओळखून एमआरएफ ही टायर कंपनी, टायटन व एचएमटी या घडय़ाळ कंपन्या आणि बीपीएल, क्राऊन अशा टीव्ही कंपन्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या विविध दालनांच्या साइन बोर्डच्या कामांसाठी प्रभातला पाचारण करण्यात आले. तसेच टेल्को, बजाज, कायनेटिक, इंडियन कार्ड क्लोझिंग, एस्केएफ अशा मोठय़ा कंपन्यांची कामेही या व्यवसायाने केली आहेत. सध्या दुकाने, कारखाने, कंपन्यांच्या पाटय़ांकरिता निऑन साइन तसेच मेटल बोर्डला सर्वाधिक मागणी आहे. व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत प्रभातने काळानुरूप बदल केले. आता एलईडी साइन बोर्डमध्ये फर्म काम करते. एलईडीमध्ये रंग बदलणारे, रंग कमीृजास्त होणारे, डॉटेड एलईडी असे विविध प्रकार आहेत. याबरोबरच अ‍ॅल्युमिनियम कम्पोझिट पॅनेलचे बोर्ड तयार केले जातात. शिर्डी, औरंगाबाद येथे कामे सुरू आहेत. खासगी कंपन्या, ज्वेलर्स, पतपेढय़ा, हॉटेल यांचीही कामे या फर्मकडून केली जातात. उत्पादित केलेला माल विक्री केल्यानंतरही सेवा दिली जाते. याबरोबरच गुणवत्तेमध्ये कोठेही कमतरता न ठेवल्याने फर्मची वाटचाल यशस्वी ठरली, असे चंद्रशेखर भंडारे सांगतात.

फर्मचे १९६९ पासून स्वत:चे उत्पादन केंद्र शनिवार पेठेत आहे. व्यवसायाकरिता आवश्यक गोष्टी या केंद्रामध्येच तयार केल्या जातात. बाहेरून काहीही बनवून घेतले जात नाही किंवा आयातही केले जात नाही हे विशेष. उत्पादन केंद्रात पंधरा लोक कायम कामाला असून चंद्रशेखर स्वत: देखरेखीचे काम पाहतात.

‘बाजाराची गरज ओळखून उत्पादन आणि विक्री यांचा ताळमेळ ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात दररोज नव्याने दाखल होणाऱ्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. या व्यवसायात अत्यंत बारीक-बारीक गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे शिकणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हे या व्यवसायात आल्यावर समजले. या व्यवसायात सेवा देणेही खूप महत्त्वाचे आहे. उत्पादित केलेला माल विकल्यानंतरही सेवा देता आली पाहिजे. तरच ग्राहकाबरोबर नाते तयार होईल. उत्पादित मालाची गुणवत्ता राखणे, ती कायम ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण गुणवत्ता राखल्यास बाजारातून अखंड मागणी राहते, हे तत्त्व कायम लक्षात ठेवूनच काम करतो,’ असेही चंद्रशेखर सांगतात.