पुणे: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्या प्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला संशोधन आणि विकास संस्थेतील तत्कालीन संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी आदेश दिले.
न्यायालयीन कोठडीत डॉ. कुरूलकर याने ॲड. ऋषीकेश गानू यांमार्फत जामीनासाठी अर्ज केला. याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. संबंधित खटला मोबाइल संच आणि त्यातील तांत्रिक बाबींवर आधारीत आहे. त्यामुळे पुराव्यात कोणत्याही स्वरुपाची छेडछाड आरोपीकडून करण्यात येणार नाही, असा युक्तीवाद ॲड. गानू यांनी केला. सरकारी वकील विजय फरगडे यांनी विरोध केला. डॉ. कुरूलकरने मोबाइलमधील काही विदा (डाटा) खोडला आहे. जप्त करण्यात आलेला एक मोबाइल नादुरूस्त असून, गुजरातमधील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल अद्याप मिळाला नाही. डॉ. कुरुलकरकडून देशाच्या संरक्षण विभागीतल गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरविण्यात आली आहे. तो उच्चपदस्थ अधिकारी असल्याने जामीन मंजूर झाल्यास पुराव्यात छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तीवाद ॲड. फरगडे यांनी केला.
हेही वाचा >>>निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? ‘लोकसत्ता अर्थभान’चे शनिवारी पिंपरीत आयोजन
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत खटल्यात प्रथमदर्शनी पुरावा दिसून येत आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर आहे. मोबाइलमधील विदा मिळवायचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार आरोपीविरोधात सकृतदर्शनी पुरावे असताना त्याला जामीन देणे उचित ठरणार नाही, असे नमूद करून डॉ. कुरूलकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.दरम्यान, निकालाची प्रमाणित प्रत अद्याप मिळाली नाही. ती मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात येईल, असे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.