पुण्यामधील औंध येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर हटवण्यात आलं आहे. रात्री या मंदिरामधून मूर्ती हटवण्यात आलीय. मात्र आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या नावाची आरती म्हणून मोदींबरोबर भारतीय जनता पार्टीवरही टीकेची झोड उठवली. तीन दिवसांमध्ये या मंदिरामधील मूर्ती हटवण्यात आल्याने पुणे भाजपाचे सर्व आमदार, खासदार, महापौर उपोषण करणार असल्याचा खोचक या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांनी लगालवाय.
नक्की वाचा >> “पुण्यात आता ५० रुपयांनी पेट्रोल, ४० रुपयांनी डिझेल आणि…”; मोदी मंदिरावरुन टोला
पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर गुरुवारी पहाटेच्या सुमारास हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकाने मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीने आज आंदोलन केलं. त्यावेळी मूर्ती हटवण्यात आल्याच्या विषयावरुन राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष जगताप यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. “या रिकाम्या गाभाऱ्यातून मी पुन्हा येईन, असा आवाज येतोय. आता भाजपाची पुण्यातील सगळी नेतेमंडळी ज्यामध्ये आमदार, खासदार, महापौर हे सारे अन्नत्याग करुन उपोषणाला बसणार आहेत असा निर्णय मला कळालाय. त्यांच्या विनंतीला मान देऊन देव कदाचित पुण्यात येईल म्हणून आम्ही रिकाम्या गाभाऱ्यासमोर हा नैवद्य ठेऊन जाणार आहोत,” असं जगताप म्हणाले.
फोटो > पाहा नक्की कसं होतं पुण्यातील मोदी मंदिराचे खास फोटो
“या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय,” असंही जगताप यावेळी म्हणाले.
मंदिर उभारणाऱ्याला म्हणाले माथेफिरु…
प्रसारमाध्यमांशी बोलताना जगताप यांनी भाजपावर टीका केली. हे मंदिर उभारल्याने पुण्यातील सर्व प्रश्न सुटणार आहेत असा गाजावाजा पुणे भाजपाने केल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. तसेच हे मंदिर उभारणाऱ्या मयुर मुंडेचा उल्लेख जगताप यांनी ‘एक अंधभक्त, माथेफिरु’ असा केला. “चार दिवसांपूर्वी येथील एका अंधभक्ताने, माथेफिरुने नरेंद्र मोदी नावाच्या देवाचं मंदिर निर्माण केलं होतं. चार दिवसांमध्ये पुण्यातील भाजपाने असं चित्र निर्माण केलेलं की नरेंद्र मोदी नावाचे देव पुण्यात अवतरलेत. ते आल्यानंतर पुण्यातील प्रश्न आता संपणार आहेत. पुण्यात रुपयाने पेट्रोल, ४० रुपयांनी डिझेल. २०० रुपयांनी सिलेंडर मिळणार आहे. महागाई संपणार, रस्ते चकाचक होणार, कचरामुक्त पुणे होणार असं चित्र निर्माण करण्यात आलं,” असा टोला जगताप यांनी लगावला.
नक्की वाचा >> “मोदी मंदिरात दर्शनला जो येईल त्याला लगेच १५ लाखांचा डीडी मिळणार असं…”
तसेच पुढे बोलताना मोदी नावाच्या या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय, असंही जगताप म्हणाले.
नक्की पाहा हे फोटो >> दिसले मोदी की पड पाया… पेट्रोल पंपांवर तरुणांची गांधीगिरी; व्हायरल झाले Photos
आरती म्हणत केली पूजा…
पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते मोदी मंदिरासमोर साकडे घालण्यासाठी आले होते. परंतु त्या आधीच मंदिरातून मोदींची मूर्ती हटवण्यात आली होती. ही मूर्ती भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या कार्यालयात असल्याचे सांगितले जात आहे. “आता तरी मोदी देवा पावणार का?, भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार का करणार का?,” असं गाणं, आरती म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरासमोर पूजा केली. कालच घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भातुकलीमधील सिलेंडर प्रातिनिधिक स्वरुपात या मंदिरासमोर मांडण्यात आलेला. तसेच पेट्रोल, डिझेल आणि तेलाच्या बाटल्याही या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. पेट्रोल, डिझेल, तेल, मसाल्याचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवून आरती देखील यावेळी करण्यात आली.
मंदिर कोणी उभारलं?
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता. मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसंच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.