पुणे : दहीहंडीचा उत्सव यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी सध्या शहरात सुरू असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठीचे शक्तिप्रदर्शनही या निमित्ताने होईल, अशी चिन्हे आहेत. चित्रपट तारे-तारकांच्या छबींसह अनेक निवडणुकोत्सुक ‘उमेदवारां’चे फलक शहरभर झळकले आहेत.
दहीहंडी उत्सव येत्या शनिवारी (१६ ऑगस्ट) साजरा करण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ‘भरीव’ साहाय्य करत आहेत. दहीहंडीपूर्वी शहरभर सुरू असलेली फलकबाजी याचेच संकेत आहेत. फलक, चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींची उपस्थिती, उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा आणि लेझर प्रकाशझोतांची प्रकाशयोजना यामुळे प्रतिमंडळ लाखो रुपयांचा खर्च होईल, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून धनकवडी, वारजे, कोथरूड,धनकवडी, सिंहगड रस्ता, विमाननगर, वडगाव शेरी, कात्रज आदी भागांतील मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाश योजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाला काही मंडळांकडून विधायक उपक्रमांचीही जोड देण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविणारी मंडळेही आहेत.
चौकट लेझर प्रकाशझोतांवर बंदी कायम
डोळ्यांना इजा पोहोचविणाऱ्या घातक लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे. मात्र, मध्य भागासह उपनगरातील मंडळांनी दहीहंडीनिमित्त ‘लेझर शो’ची तयारी केली आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी दहीहंडी, गणेशोत्सवात लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. बंदी आदेश मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, आदेश झुगारून सर्वच मंडळांनी लेझर प्रकाशझोत आणि उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती. यंदा आदेशांचे पालन होणार का, याबाबत उत्सुकता आहे.
दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दहीहंडीच्या उत्सवासाठी मध्य भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पोलिसांकडून मध्य भागातील मंडई परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ध्वनिवर्धकांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे. – राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त
नियमांचे पालन करून दहीहंडी उत्सव यंदाही साजरा करण्यात येणार आहे. मंडळाकडून सुरक्षाविषयक उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. गोविंदा पथकातील सदस्य जखमी झाल्यास उपचारांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्याची जबाबदारी मंडळाने यंदाही घेतली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास दहीहंडी फोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. – बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट —