९ लाख रोजगार उपलब्ध, २७४२ जणांकडून लाभ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाच्या प्रमाणात यंदा झालेली घट आणि परतीच्या पावसाने मारलेल्या दडीमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे कामाच्या शोधासाठी राज्याच्या विविध भागातून नागरिकांचे स्थलांतर पुण्यात सुरू झाले आहे. दुष्काळग्रस्तांच्या हाताला रोजगार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्य़ात तब्बल ९ लाख रोजगारांची निर्मिती केली आहे. मात्र त्याचा लाभ केवळ दोन हजार ७४२ जणांनी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांनी रोजगाराकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाऊस कमी पडल्याने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतीची कामे नसल्याने आणि रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून कामाच्या शोधासाठी शहराचा आसरा घेण्यात सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार पुढील एक ते दीड महिन्यामध्ये सोलापूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी जिल्ह्य़ांतून तेथील रहिवासी पुणे शहरात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.

सध्या शहरामध्ये पाण्याबाबत काहीशी टंचाईची स्थिती आहे. नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाल्यास पाण्यासह अन्नधान्याबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासकीय धान्याचा कोटा दहा टक्क्य़ांनी वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. तसेच स्थलांतरितांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी जिल्हा स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) तब्बल नऊ लाख रोजगारांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, सद्य:स्थितीत केवळ दोन हजार ७४२ जणांनी त्याचा लाभ घेतला असल्याची माहिती रोजगार हमी योजनेचे उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी यांनी दिली. या रोजगारांतर्गत काम करणाऱ्यांचे वेतन पंधरा दिवसांनी थेट बँकेत जमा केले जाते, असेही जोशी यांनी सांगितले.

शहरासह जिल्ह्य़ातील रोजगार उपलब्ध

शहरात वन विभागांतर्गत वृक्ष लागवड, नदी खोलीकरण, तसेच छपाई व मुद्रणाचे काम, ग्रामीण भागातील कामांसाठी लागणाऱ्या वाहनांसाठी चालक, खड्डे करण्यासाठी डंपर चालक, यंत्र इत्यादी सामग्री संचालनासाठी चालक, कामगार, नदी स्वच्छता, शोषखड्डे घेणे, मागणीनुसार मजूर उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे, पाणीवाटपासाठी टँकरचालक, तसेच कौशल्य विकास योजनेत असे मिळून पाच लाख रोजगार उपलब्ध आहेत. तर, जिल्ह्य़ात वन विभागांतर्गत रोपवाटिका आणि वृक्ष लागवड, कृषी विभागांतर्गत फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळी, शोषखड्डे, विहीर खोदाई, नाला सरळीकरण, शौचालय उभारणे, सामाजिक वनीकरण या अंतर्गत चार लाख असे शहरासह जिल्ह्य़ात मिळून नऊ लाख रोजगार उपलब्ध आहेत.

नोंदणी करण्याचे आवाहन

कामाची गरज असणाऱ्या संबंधित व्यक्तीने महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ या ऑनलाइन संकेतस्थळावर जाऊ न रोजगारासाठी नोंदणी करावी किंवा संबंधित परिक्षेत्राच्या तलाठी, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prepare to give employment to drought victims
First published on: 25-01-2019 at 00:51 IST