लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : आमचे भांडण मंत्रालयाशी होते. सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. सनदी अधिकारी दाद देत नाहीत. मंत्रालयात महिनो-महिने, वर्षेभर नस्ती (फाइल) प्रलंबित राहते. अधिकारी नस्ती फेकून देतात, अशी खंत शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडमधील शतक महोत्सवी दोन दिवसीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित रविवारी पार पडला. या वेळी बोलताना डॉ.जब्बार पटेल म्हणाले की, आमचा झगडा नेत्यांशी नव्हे मंत्रालयाशी होतो. सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. सनदी अधिकारी दाद देत नाहीत. मंत्रालयात महिनो-महिने, वर्षेभर नस्ती प्रलंबित राहते. अधिकारी नस्ती फेकून देतात. आम्ही गेलो की आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे सांगतात. नस्ती फेकून देतात. शेतकऱ्यांना मदत करावी. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, जातीचे तणाव नाटकात मांडतो. पण, शेतकऱ्यांप्रमाणे नाटक क्षेत्रही महत्वाचे आहे.

आणखी वाचा-ढोकळा खायला बुलेट ट्रेनची गरज कशाला? राज ठाकरे यांचा टोला

कलेचा प्रभाव वाढवायचा असेल तर अधिकाऱ्यांना कलाकारांची कामे जलदगतीने करावी लागतील. मृदुंग आणि तबल्यातील फरक दहावीच्या मुलांना समजला पाहिजे. त्यासाठी शाळेतून कला शिकविण्याची सुरुवात करावी. त्यामुळे उत्तम नट, गायक तयार होतील. प्रशिक्षित कलावंत ही उत्तम गरज आहे. अनेक संस्थानिकांनी कलेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनीही कलेला मदत करावी. संमेलनात बंगाली, केरळ या सर्वांना आणून देशाचे चित्र निर्माण केले पाहिजे. दोन नाटक पाश्चात्य असली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशांत दामले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उत्तम रंगकर्मी आहेत, हे सर्वांना मान्य करावेच लागेल. ते उत्तम नाटक करतात. त्यांचे क्षेत्र जास्त आहे. आमचे ४० बाय ४० फुटाचे असते. शासनाकडून नाट्यगृहात नेमलेल्या व्यवस्थापकाला आपले काम काय आहे, याची माहिती नसते. ते वेगवेगळ्या विभागातून आलेले असतात. यामुळे बराच गोंधळ होतो. त्यामुळे नाट्यगृहात जेष्ठ कलाकारांना व्यवस्थापक म्हणून घ्यावे. जेणेकरून नाट्यगृह सुस्थितीत राहण्याचा प्रश्न संपेल. त्यामुळे शासनावरील भार कमी होईल. गुंतविलेल्या पैशाचे मोल अनेक वर्षे राहील.