scorecardresearch

पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर ; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा भाजपाचा डाव असल्याची विरोधकांची टीका

(संग्रहीत प्रातिनिधिक छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या (रविवार) पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. तर, मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोद दर्शवण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांकडून आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेसच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर समोरील घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यलायासमोर आंदोलन केले जाणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे स्टेशन येथे काळे कपडे घालून मूक आंदोलन करणार आहे.

पुणे शहरातली बहुप्रतीक्षित असलेल्या मेट्रोचे आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय पर्यंतच्या टप्प्याचे उद्घाटन, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण, जायका या प्रकल्पासह अनेक कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. तसेच, लवळे येथील सिम्बॉयोसिस महाविद्याल येथे कार्यक्रमासही देखील मोदी उपस्थित राहणार असून, कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा देखील घेणार आहेत. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे नेते मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मंडळी असणार आहेत.

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा घाट पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून घातला जात आहे. यातील अनेक प्रकल्प अर्धवट राहिले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे.

तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जाणार आहे. यामुळे येत्या काळात महापालिकेतील सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prime minister modi to visit pune tomorrow congress ncp will agitate msr 87svk

ताज्या बातम्या