सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रासाठी नवीन यंत्रणा खरेदी केली. या यंत्रणेमुळे एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्रांची छपाई करणे शक्य आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील मुद्रण कक्षात या यंत्रणेचे सोमवारी उद्घाटन झाले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे,  व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, संतोष ढोरे, डॉ. महेश आबाळे, डॉ. सुधाकर जाधवर, परीक्षा विभागातील विशेष कार्याधिकारी दत्तात्रय कुटे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – वर्तुळाकार रस्त्यासाठी २५० कोटींचा निधी

विद्यापीठाकडून गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे रखडल्याबाबत काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने नवीन यंत्रणा खरेदी केली. डॉ. सोनवणे म्हणाले, की पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील जवळपास ६५० महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. साधारण आठ लाख विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र दिले जाते. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने नवीन यंत्रणा खरेदी केली. आधीच्या यंत्रणेमध्ये एकावेळी केवळ पाचशे पेपर भरता यायचे,  तर नव्या यंत्रणेमध्ये एकावेळी आठ हजार पेपर लोड करता येतात. तसेच ‘इमेज प्रोसेसिंग’ जलद होणार असल्याने वेळ वाचेल, असे डॉ. काकडे यांनी सांगितले. 

हेही वाचा – शहरासह जिल्ह्यात ८० शिवभोजन केंद्रे तीन महिन्यांपासून निधीविना; आहार वितरण अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने फटका

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छपाई अधिक जलद होण्याच्या दृष्टिकोनातून छपाई यंत्रणा खरेदी करण्यात आली. परीक्षा विभाग अधिक सक्षम करण्यावर भर आहे.- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ