राफेल विमान खरेदी करारामध्ये चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा आजपर्यंतचा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा घोटाळा आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सतत पिछाडीवर जात असल्यामुळे चार वर्षांत अठ्ठेचाळीस हजार कोटींची गुंतवणूक देशाबाहेर गेली. चलनाची किंमत घटल्याने आयात महाग होऊन इंधनाच्या दरात वारेमाप वाढ झाली. केंद्र आणि राज्यातील सरकार जुमलेबाज सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास दर पिछाडीवर आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने निघोजे (ता. खेड) येथे पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संवाद शिबिराचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, शिबिराचे प्रशिक्षक, आमदार रामहरी रूपनवर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, की देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून जात आहे. २०१८ या वर्षांत चलनाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांची थकीत कर्जे वाढत चालली आहेत. आयएफएलएसच्या आर्थिक घोटाळय़ामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यूपीएच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ४७ रुपये होती, ती सध्या ऑक्टोबर २०१८ मध्ये ७३ रुपये इतक्या नीचांकी पातळीवर गेली आहे. भारतीय चलनाची किंमत घटल्यामुळे आयात महाग झाली आहे. मोदी सरकारने साडेचार वर्षांच्या काळात २१ लाख कोटींपेक्षा अधिक कर जमा केला, मात्र जनतेला अच्छे दिन पाहायला मिळाले नाहीत. वाढीव कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिकांना चढय़ा दराने इंधनाची खरेदी करावी लागत असून त्याचे चटके सामान्यांना सोसावे लागत आहेत. प्रशिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. प्रशिक्षित कार्यकर्त्यांमुळे निवडणुका जिंकणे सोपे जात असल्याचे मत आमदार रामहरी रूपनवर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan on rafale deal scandals
First published on: 22-10-2018 at 03:55 IST