“पृथ्वीराज चव्हाण हे वयाने मोठे आहेत. मी त्यांचा आदर करतो. परंतु ते माझा पराभव दोन लाखांनी होईल याबाबत जे भाकीत करत आहेत, प्रत्यक्षात त्यांची जनमानसातली स्थिती पाहिली तर त्यांना त्यांच्या घरातील मते तरी मिळतात का?” अशी टीका सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत उदयनराजे यांच्यावर आरोप करताना साताऱ्याला अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांपैकी कोणीही आले तरी उदयनराजे भोसले दोन लाख मतांनी पराभूत होतील, असे भाकीत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमिवर त्यांनी ही टीका केली आहे.
तसेच उदयनराजे म्हणाले, की “ते वयाने मोठे असल्यामुळे मी त्यांचा आदर करतो. परंतु त्यांनी अशी वक्तव्ये करून नयेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री वा मुख्यमंत्री असताना साताऱ्याचा ,पश्चिम महाराष्ट्राचा व राज्याचा कोणताही विकास त्यांनी केला नाही. त्यांच्याकडे कोणतीही दृष्टी नाही. सातारा जिल्ह्यत पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता व नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला. परंतु या साठ वर्षांमध्ये या मंडळींना कोणताही विकास साधता आला नाही.”
उदयनराजे भोसले यांनी केलेल्या या आरोपांवर आता पृथ्वीराज चव्हाण काय प्रतिक्रीया देतात हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.