पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने आकाशात झेपावलेल्या खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी घडली. सुमारे एक तास आकाशात असलेले विमान वैमानिकाने पुन्हा विमानतळावर सुरक्षितपणे उतरविले. पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणारे बोईंग ९३७ हे खासगी कंपनीचे विमान सोमवारी सकाळी नियोजित वेळेत दिल्लीच्या दिशेने झेपावले.

काही वेळानंतर वैमानिकाला तांत्रिक समस्या आढळून आली. वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाबरोबर संपर्क साधून विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरविण्यासाठी परवानगी मागितली. परवानगी मिळताच वैमानिकाने विमान सुरक्षितरीत्या विमानतळावर उतरवले. दरम्यान, विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पुन्हा विमान उतरवावे लागल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

उड्डाणानंतर वैमानिकाला तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैमानिकाने विमान पुन्हा विमानतळावर उतरविण्यासाठी ‘एटीसी’कडे परवानगी मागण्यात आली. अन्य विमानांची उड्डाणे असल्याने नियोजन करून हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. मानक पद्धतीनुसार प्रक्रिया हाताळण्यात आली.- संतोष ढोके,संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ