दोनशे ते बाराशे रुपये दंड, करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय
पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थेच्या परिसरात थुंकल्याचे आढळल्यास दोनशे ते बाराशे रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून, दंड वसूल करण्याचा अधिकार मुख्याध्यापक, प्राचार्याना देण्यात आला आहे.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास इतर व्यक्ती बाधित होऊ शकतात, प्रसार वाढू शकतो. तसेच क्षयरोग किं वा अन्य आजारांची लागण थुंकल्यामुळे होऊ शकते. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे, त्यांना शिक्षणासाठी निरोगी वातावरण पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेच्या परिसरात थुंकल्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नयेत या दृष्टीने थुंकण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आल्या.
शैक्षणिक परिसरात थुंकण्याबाबत शिक्षकांकडून उल्लंघन झाल्यास प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येईल, असे वारंवार घडल्यास कमाल बाराशे रुपयांपर्यंत दंड देय राहील. तसेच सामान्य नागरिकांकडूनही दोनशे ते बाराशे रुपये दंड देय राहील. मार्गदर्शक सूचनांच्या नियमित देखरेखीची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी प्राधिकृत केलेल्या शिक्षकांची असेल, असे नमूद करण्यात आले आहे.