‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पार्टी आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ राज्यभरात आक्रमक झाल्याचं चित्र गुरुवारपासून पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्यात झालेल्या एका आंदोलनामध्ये उत्साही महिला कार्यकर्त्याकडून राहुल गांधींचा निषेध करताना राहुल गांधींऐवजी सावरकरांच्या फोटोलाच चप्पल मारण्याचा प्रकार अगदी थोडक्यात टळला.

राहुल गांधींनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्यातील सारसबागेसमोरील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शिंदे गटाचे पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनातील बॅनरवर एका बाजूला राहुल गांधी यांचा लाल फुल्ली मारलेला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता.

सर्वजण घोषणाबाजी करीत असताना अचानक एक महिला कार्यकर्ती पायातील जोडे काढून बॅनरवरील सावरकरांच्या फोटोला जोडे मारण्यासाठी पुढे सरसावली. या महिलेची गल्लत होत असल्याचं एका कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्याने महिलेस रोखलं आणि तिला तिची चूक दाखवून दिली. त्यामुळे ही महिला वेळीच थांबली. मात्र आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या महिलेने राहुल गांधींचा निषेध करताना राजीव गांधी मुर्दाबादच्या घोषणाही दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनानंतर शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींवर टीका केली. “राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली. पण त्यांनी ही यात्रा करण्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य वाचावे, त्यामुळे त्यांना देश समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर ब्रिटिशांकडून सावरकर हे पेन्शन घेत होते हे राहुल गांधी यांचे विधान निषेधार्थ असून आता आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील घरी पेन्शन पाठविणार आहोत,” असं भानगिरे म्हणाले.