जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. यावेळी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, राज्यातील प्रत्येक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे. या सरकारने दिव्यांग, वारकरी, विद्यार्थी आणि आता मराठा आंदोलक यांच्यावर पोलिसांकरवी हल्ला करवून हुकुमशाहीचे प्रत्येय राज्याला दाखवला आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी राज्यभर हजारोंच्या संख्येने आंदोलन यापूर्वी देखील झाले आहेत. परंतु, लाखोंच्या संख्येने जमलेले मराठा बांधव यांनी कधी त्या मोर्चाला गालबोट लावल्याचे प्रकार या महाराष्ट्रात घडलेला नाही. काल झालेल्या घटनेसाठी सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याच सांगत सरकारी यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला.
हेही वाचा >>>Jalna Lathi Charge : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळेच…”, शरद पवार यांचा आरोप
विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले, शहरातील आमदारांनी या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे होते. मात्र, भाजप आमदार हे त्यांच्या नेत्यांच्या एवढे दडपणाखाली आहेत की साधा निषेध करायला हि ते धजावत नाहीत. येणाऱ्या काळात शहरातील मराठा समाज याच उत्तर मतदानाच्या माध्यमातुन नक्की देईल.
हेही वाचा >>>Jalna Lathi Charge: जालन्यात लाठीमाराचा आदेश कोणी दिला; रोहित पवार यांचा प्रश्न
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या या आंदोलनात विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव, संदीप चव्हाण, अनिल भोसले, शिवाजी पाडाळे, युवक उपाध्यक्ष ओम शिरसागर सरचिटणीस विकास कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.