पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी घेण्यात आलेल्या) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९मधील ९४ पात्र उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे ‘आम्हाला नियुक्ती द्या’ असे फलक हाती घेऊन नियुक्ती प्रलंबित असलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

एमपीएससीतर्फे अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९मधील १ हजार १४३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. मात्र आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ९४ उमेदवार वगळून अन्य उमेदवारांना राज्य शासनाकडून नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे संबंधित ९४ उमेदवारांची जलसंपदा, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांसी शिफारस होऊनही त्यांना नियुक्तीसाठी गेल्या काही काळापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. या पूर्वी नियुक्ती मिळण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. नियुक्ती मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नियुक्ती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याचे उमेदवारांनी सांगितले.