पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पवार गटाच्या युवक कार्यकर्त्यांनी पिंपरीत निदर्शने केली. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार’, ‘आले शंभर गेले शंभर शरद पवार एक नंबर’, ‘आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार शरद पवार’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जोरदार निदर्शने केली. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर,  सागर तापकीर, माधव पाटील, संतोष शिंदे, काशिनाथ जगताप,  रेखा मोरे, मेघराज लोखंडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>महत्वाची बातमी : जुने, त्रासदायक महसूल कायदे होणार कालबाह्य

 इम्रान शेख म्हणाले की, निवडणूक आयोगाचा  निर्णय  लोकशाहीची हत्या करणारा आहे. देशात सर्व राज्यात  विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव मोदी सरकारचा असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याआधीही राज्यात शरद पवार  यांनी कित्येक वेळा पन्नास-साठ आमदार स्वतःच्या हिमतीवर निवडून आणलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून आणायची क्षमता आणि ताकद फक्त पवार साहेबांकडेच आहे. त्यामुळे पक्ष चिन्ह जरी  डाव खेळून हिसकावून घेतला असेल. परंतु आमच्यासाठी शरद पवार साहेब हेच चिन्ह आणि हेच पक्ष आहेत. सत्तेचा उन्माद करणाऱ्या या भाजप सरकारला  येणाऱ्या निवडणुकीत जनता योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, “शिव-फुले-शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या शरद पवार  यांना महाराष्ट्राच्या जनतेने पन्नास वर्षे आशीर्वाद दिलेला आहे. पवार साहेब यांनी महिलांना निवडणुकीत ५० टक्के आरक्षण देऊन राज्यातील महिलांना सत्तेत बरोबरीचा वाटा दिलेला आहे. त्यामुळे राज्यातील महिला फक्त साहेबांच्या पाठीशी उभ्या राहतील. पक्षाशी गद्दार करणाऱ्यांना आज मी एवढेच सांगेल की बाप हा बापच असतो.