पं. बिरजू महाराज यांची भावना
व्यक्तीच्या गुणांची पूजा होत असते, व्यक्तीची नाही. त्या गुणांचा अभ्यास, प्रेम, आत्मियता आणि विश्वास नसता तर मी केवळ बिरजू राहिलो असतो, बिरजू महाराज झालो नसतो, अशी भावना कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांनी व्यक्त केली.
आदित्य प्रतिष्ठानतर्फे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते बिरजू महाराज यांना लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ कथक नृत्यांगना शाश्वती सेन, मनीषा साठे आणि अपर्णा अभ्यंकर या वेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर मनीषा साठे व शिष्या आणि शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथकच्या विद्यर्थिनींनी ‘कथक नृत्यसंध्या’ हा विशेष कार्यक्रम सादर केला.पं. बिरजू महाराज म्हणाले, जीवनात मला सर्व वडीलधाऱ्यांचा नेहमीच आशीर्वाद मिळत राहिला आहे. बंगाल माझी माता तर महाराष्ट्र माझा पिता आहे.
महाराष्ट्रात संगीतावर आणि नृत्यकलेवर प्रेम करणारे रसिक भरपूर आहेत. आपल्यासारख्या रसिकांमुळेच परंपरेची जपणूक होत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी घुंगरांना आणि घुंगरू नादाला कधीही विसरणार नाही.अभ्यंकर म्हणाले, बिरजू महाराज जेव्हा रंगमंचावर येतात, तेव्हा ते श्रीकृष्णाशी एकरूप होतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे नृत्य संगीत आणि नाटय़ाचा त्रिवेणी संगम आहे. भारतीय परंपरेत नृत्याला मोठे स्थान आहे. कथकमधून सर्व रस प्रकट होतात.