सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या परिसरामध्ये ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या उद्देशातून घटस्थापना (१३ ऑक्टोबर) आणि दसऱ्याला (२२ ऑक्टोबर) मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महालक्ष्मी मंदिरामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी आठ वाजता घटस्थापना होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून टाकण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते सायंका़ळी साडेसहा वाजता या रोषणाईचे उद्घाटन होणार असल्याची माहिती श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टच्या विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली. नवरात्रोत्सवकाळात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री सुक्तपठण, ललिता पंचमीला (१९ ऑक्टोबर) महापालिका शाळांमधील ३५१ मुलींचे कन्यापूजन, कथक नृत्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत. कोथरूड अंधशाळेतील विद्यार्थिनी, महापालिका सफाई कर्मचारी, अग्निशमन दलातील कर्मचारी, रिक्षाचालक अशा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांच्या हस्ते दररोज सामुदायिक आरती होणार आहे. मंदिरात रांगेतील वेळ वाचविण्यासाठी भाविकांना महालक्ष्मीचे मुखदर्शन घडविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.