लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘भारत मातेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार फार महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात हा विचार पुढे जायला हवा. प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यासाठी हा विचार मार्गदर्शक आहे. भारतीय जनता पक्षातील मूळ प्रवाहपर्यंत संघाचा विचार जाणे गरजेचे आहे,’ असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले.

कोथरूड येथील सिद्धार्थ पॅलेसच्या सभागृहात समग्र विचार दर्शनतर्फे रमेश पतंगे लिखित ‘आम्ही संघात का आहोत’ या पुस्तकाचे प्रकाशन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चव्हाण बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, लेखक रमेश पतंगे, समग्र विचार दर्शनचे समीर कुलकर्णी, निखील पंचभाई, रश्मिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘रमेश पतंगे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून संघाचा विचार पुढे नेण्याचे काम केले आहे. देवेंद्र फडणवीस लिखित अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक जसे सर्व पक्षीय आमदारांना मार्गदर्शक ठरते आहे, अगदी तसेच पतंगे सरांचे हे पुस्तक प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मार्गदर्शक ठरेल, असेच आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाजासाठी असलेले योगदान अधोरेखित करताना वंजारवाडकर म्हणाले, ‘जिथे दुःख असते, वेदना असते. तिथे संघाचा स्वयंसेवक काम करतो. तो अग्रेसर असतो. भगवा ध्वज आणि भारत माता ही दोन प्रतीके प्रत्येक संघ स्वयंसेवकाला प्रेरणा देतात. याच प्रेरणेतून संघ स्वयंसेवक समाजातल्या अनेक प्रश्नांवर काम करतो. स्वयंसेवकाच्या या अनुभवांना जाणून घेण्यासाठी, संघ समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकानेच पतंगे सरांचे हे पुस्तक वाचायला हवे.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खंडेलवाल यांनी केले. पीयूष कश्यप यांनी आभार मानले. अरुंधती शहा यांच्या वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.