scorecardresearch

पुणे – बावधन कचरा प्रकल्पाच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींची भव्य मानवी साखळी

हजारो नागरिकांच्या घोषणांनी दणाणला परिसर

”बावधन कचरा डेपो हटवा राम नदी वाचवा”, ”रद्द करा रद्द करा कचरा डेपो रद्द करा” अशा विविध घोषणांनी प्रस्तावित बावधन कचरा डेपोचा परिसर आज (रविवार) दणाणून गेला. तीन वर्षाच्या बालकापासून ते 88 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत शेकडो पर्यावरणप्रेमींनी मानवी साळखीव्दारे आपली ताकद दाखवत बावधन कचरा प्रकल्पाला असलेला आपला विरोध प्रदर्शित केला. यानिमित्ताने पहिल्यांदाच हजारो नागरिक, पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्था, पर्यावरण तज्ज्ञ, सर्वपक्षीय स्थानिक नेते रस्त्यावर उतरले होते.

पुणे म.न.पा. सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आलेला बावधन कचरा प्रकल्प/ संकलन केंद्र/ रॅम्प प्रस्ताव धुडकावून पुन्हा काम सुरु केल्याच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज भव्य मानवी साखळी करून आपला निषेध नोंदवला. चांदणी चौकाकडून भूगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सूरभी हॉटेलजवळ या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

या मानवी साखळीत माजी खासदार प्रदिप रावत, किर्लोस्कर वसुंधरा, रामनदी रीस्टोरेशनचे वीरेंद्र चित्राव, बावधन कचरा प्रकल्प विरोधी कृती समिती आणि संयोजन समितीचे सदस्य माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेवक कल्पना वर्पे, भूगावच्या सरपंच निकिता सणस, भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, महादेव अण्णा कोंढरे, कृषि उपत्न बाजार समितीचे उप सभापती दगडुकाका करंजवणे, माजी उपसरपंच भूगाव जनसेवा फाउंडेशनचे अक्षय सातपुते, भुकूमचे उप सरपंच सचिन हगवणे, माजी सैनिक अनिल चोंधे, उद्योजक आबा रावत, सामाजिक कार्यकर्ते पराज राजपूत, पर्यावरण कार्यकर्ते किशोर मोहोळकर, स्थानिक कार्यकर्ते अनिल करंजावणे, सामाजिक कार्यकर्ते सी.एम.जोशी यांच्यासह पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार – प्रदिप रावत

यावेळी बोलताना माजी खासदार प्रदिप रावत म्हणाले की, ”या कचरा प्रकल्पामुळे नदीचे आणि पर्यायाने काठावरील हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. पर्यावरणप्रेमींनी कठोर विरोध करून या प्रकल्पाचे काम थांबविले पाहिजे.”

या पूर्वी प्रस्तुत प्रकल्प, स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला होता -निकिता सणस

यावेळी बोलताना भूगावच्या सरपंच निकिता सणस म्हणाल्या की, ”दिनांक १० मार्च २०२२ रोजी मौजे बावधनखुर्द येथील सर्व्हे नं. ६४ येथे, राम नदी किनारी कचरा संकलन केंद्राचे काम पुन्हा सुरू करण्यात आले, हे दुर्दैवी आहे. वास्तविक पहाता या पूर्वी प्रस्तुत प्रकल्प, स्थानिकांच्या विरोधामुळे २९ डिसेंबर २०११ रोजी रद्द करण्यात आला होता आणि तशी नोंद पुपो म.न.पा.च्या ठरावात नमूद आहे.”

राम नदी प्रदुषित होणार – वीरेंद्र चित्राव

तसेच किर्लोस्कर वसुंधरा, रामनदी रीस्टोरेशनचे वीरेंद्र चित्राव म्हणाले की, ”प्रस्तुत कचरा संकलन केंद्र राम नदीच्या पूररेषेत येते. याच जागेत सुमारे ६०० फूटाचा नदी किनारा असल्यामुळे राम नदी प्रदुषित होणार आहे.”

नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय – सुवर्ण आंग्रे

भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे म्हणाल्या की, ”वारजे, शिवणे इ. गावांमधून कचरा गोळा करायचा, तो सुमारे १०० वाहनांमधून येथे आणायचा आणि पुन्हा १०० वाहनांमधून तो कात्रज, कोंढवा इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊनजायचा, हा नियमित कर भरणाऱ्या आम्हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे.”

दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार – दिलीप वेडे पाटील

यावेळी बोलताना माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील म्हणाले की, ”या प्रकल्पा शेजारी डि.पी. रोड आहे आणि दुसऱ्या बाजूला कोकणात जाणारा हायवे आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे या रत्यावर आधीच वाहतुकीचा प्रचंड ताण आहे, त्यात या २०० वाहनांची रोज ये-जा केल्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.”

यावेळी माजी सैनिक अनिल चोंधे म्हणाले की, ”पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी शिरणार असून यामुळे जमिनी खालून वाहणाऱ्या नदीचे पाणी आणखी प्रदुषित होणार आहे. ”

‘बावधन कचरा डेपो हटाव’ मानवी साखळीस या संस्थांनी दर्शवला पाठिंबा –

‘बावधन कचरा डेपो हटाव’ मानवी साखळीस किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पूनरुजीवन, एकोलोजिकल सोसायटी, जीवितनदी, जलबिरादरी, वसुंधरा स्वच्छ्ता अभियान, मिशन ग्राउंड वॉटर, जलदेवता सेवा अभियान, पराडकर फाउंडेशन, सागर मित्र, उदय काळ फाउंडेशन, सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान, सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, एकोलोजी फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन, लायन्स डिस्ट्रिक्ट 3234, लायन्स क्लब पुणे इको फ्रेंड, उमा फाउंडेशन, कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर आणि धार फाउंडेशन या संस्थांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune a huge human chain of environmentalists protesting the bavdhan waste project msr

ताज्या बातम्या