पुणे : पुणे परिसरात करोना संकटानंतर मोठ्या घरांना मागणी वाढू लागली होती. ही मागणी कमी होऊन आता छोट्या आणि परवडणाऱ्या घरांकडे कल वाढू लागला आहे. पुण्यात ऑगस्ट महिन्यात घरांचे १३ हजार २५३ व्यवहार झाले. त्यापैकी ३० टक्के व्यवहार २५ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचे झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे प्रमाण २५ टक्के होते. यामुळे पुणेकरांची पसंती पुन्हा एकदा परवडणाऱ्या घरांना मिळू लागल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात ऑगस्टमध्ये एकूण १३ हजार २५३ घरांचे व्यवहार झाले. त्यातून सरकारला ४८५ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. घरांच्या व्यवहारांचा विचार करता, गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत त्यात ३ टक्के घट झाली आहे. याच वेळी मुद्रांक शुल्क महसुलात १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. पुण्यातील एकूण घरांच्या विक्रीत २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण ३० टक्के आहे.
‘गेल्या महिन्यात परवडणाऱ्या घरांचे एकूण ३ हजार ९७५ व्यवहार झाले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे व्यवहार ३ हजार ४११ होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे,’ असे नाइट फ्रँकच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
घरांच्या एकूण व्यवहारांचा विचार करता २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण २७ टक्के आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे प्रमाण ३१ टक्के होते. ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण प्रत्येकी २७ टक्के असून, गेल्या वर्षी ते २९ टक्के होते. त्यामुळे २५ लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी १ ते २.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण १३ टक्क्यांवर स्थिर आहे. पुण्यात २.५ ते ५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण ३ टक्के असून, गेल्या वर्षी ते २ टक्के होते. पाच कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील घरांच्या व्यवहारात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये काही प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे मुद्रांक शुल्क महसुलातही घट झाली. पुणे परिसरात परवडणाऱ्या घरांना पुन्हा मागणी वाढत आहे. – शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया
पुण्यातील घरांची विक्री
आकारमान (चौरस फुटांमध्ये) – ऑगस्ट २०२४ मधील प्रमाण – ऑगस्ट २०२५ मधील प्रमाण (टक्क्यांमध्ये)
५०० पेक्षा कमी – २२ – २७
५०० ते ८०० – ४६ – ४०
८०० ते १००० – १५ – १५
१००० ते २००० – १५ – १५
२००० पेक्षा जास्त – २ – ३