पुणे : मानव्यविद्यांमध्येही कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) प्रभाव वाढत असून, शिक्षण संस्था आता अभ्यासक्रमात ‘एआय’चा समावेश करण्यापासून ‘एआय’चा विद्यार्थ्यांवरील प्रभाव लक्षात घेऊन अध्यापनात बदल करण्यापर्यंतचे प्रयोग करत आहेत. त्याच वेळी, ‘एआय’ साधनांच्या अतिरेकी वापरात धोका असल्याचे निरीक्षण नोंदवून ‘एआय’च्या साह्याने धडे गिरवताना विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या विकासाला महत्त्व देणे गरजेचे असल्यावर तज्ज्ञ भर देत आहेत.

पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठाने ‘लिबरल आर्ट्स’मध्ये ‘एआय’चा समावेश केला असून, मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान या कला शाखांच्या शिक्षणासाठीही ‘एआय’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यापासून ‘एआय’ संबंधी शिक्षणाचा अंतर्भाव लिबरल आर्ट्स प्रशिक्षणात केला जाईल, असे विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स’च्या प्राचार्य डॉ. प्रीती जोशी यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘एआयचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रांत वाढतो आहे. मात्र, मानवी मूल्ये आणि विचार प्रणाली अद्यापही महत्त्वाची ठरते. मानवी बुद्धी आणि सर्जनशीलतेला ‘एआय’ची जोड मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना ‘एआय’च्या योग्य वापराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एआय’कडून हवे तेवढेच घ्या, त्यापुढे स्वत:ची सर्जनशीलताच महत्त्वाची ठरते, हेही विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे.’‘प्रतिमा, मजकूर, दृक्-श्राव्य अशा सगळ्या माध्यमांतून निर्माण होणारा विदा, त्याचे विश्लेषण, आशयनिर्मिती अशा अनेक कारणांसाठी ‘एआय’चा वापर होतो. मानव्यविद्यांच्या शिक्षणात आता ‘एआय’ चा वापर करावा लागेल. प्रत्यक्ष वापराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘एआय’चे धडे शिकवायला हवेत,’ असे मत ‘एआय’ तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी व्यक्त केले.

‘इथून पुढच्या काळात ‘एआय’बरोबरच नाही, तर ‘एआय’ वापरणाऱ्या माणासाबरोबरही स्पर्धा आहे, हे ओळखून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करायला हवे. त्यांना तांत्रिक संकल्पनांमध्ये न अडकवता याेग्य वापर कसा करायचा हे सांगायला हवे. ‘प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग’चे धडे विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे,’ असे डॉ. केळकर यांनी सांगितले.

शहरातील पारंपरिक, स्वायत्त महाविद्यालयांनी मानव्यविद्यांच्या अध्यापनात ‘एआय’चा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली नसली, तरी विद्यार्थी एआय साधने वापरतात हे लक्षात घेऊन अध्यापनात बदल करण्यास सुरुवात केली असल्याचे काही प्राध्यापकांनी नमूद केले.

लिबरल आर्ट्सचे विद्यार्थी चित्रपट, नाटक, जाहिरात, आशय निर्मिती, इव्हेंट व्यवस्थापन, रचनात्मक लेखन, संरचनाशास्त्र अशा विविध सर्जनशील क्षेत्रांमधील करिअरची निवड करतात. या सगळ्यांवर ‘एआय’चा मोठा प्रभाव असल्याने विद्यार्थ्यांना ‘एआय’ आणि त्याचा नैतिक वापर शिकवणे गरजेचे आहे.

  • डॉ. प्रीती जोशी प्राचार्य, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, श्री बालाजी विद्यापीठ

‘एआय’च्या प्रभावापासून कोणतीही शाखा अलिप्त राहणार नाही. मानव्यविद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनीही ‘एआय’चे धडे गिरवणे गरजेचे आहे. मात्र, ‘एआय’चा अतिरेकी वापर न करता विद्यार्थ्यांनी स्वत:च्या विचारांना चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शेवटी त्यांची आकलन, विचार क्षमताच महत्त्वाची आहे.

  • डॉ. भूषण केळकर, ‘एआय’ तज्ज्ञ