धावपट्टीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २६ एप्रिल ते ९ मे या १४ दिवसांच्या कालावधीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवाईदलाकडून विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आलेल्या माहितीनुसार धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी १४ दिवस विमानतळ बंद राहणार आहे. सध्या केवळ दिवसा पुणे विमानतळावर विमान उड्डाण होत आहे. रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधीत धावपट्टीच्या कामासाठी विमानतळ बंद ठेवले जात आहे. मात्र, २६ एप्रिल ते ९ मे या कालावधीत पूर्ण वेळ विमानतळ बंद राहणार आहे. त्यामुळे उन्हाळी सुटय़ांसाठी प्रवासाचे नियोजन करताना पुणे विमानतळ कार्यरत नसल्याची नोंद घेतली जावी, असे आवाहन विमानतळ प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.