पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘मीट अँड ग्रीट’ आणि ‘पोर्टर’ ही (हमाल सेवा) पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे हवाई प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर झाला असून, प्रवाशांना याचा फायदा होईल, असे पुणे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
विमान प्रवासापूर्वी कॅबने किंवा इतर खासगी वाहनाने विमानतळावर आलेल्या प्रवाशांना सोबत असलेले साहित्य, सामान किंवा जड पिशव्या टर्मिनलपर्यंत नेहण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने २०२१ मध्ये रेल्वे स्थानकातील हमाल सेवेप्रमाणे २०० रुपये शुल्क आकारून टर्मिनलपर्यंत सामान वाहून नेहण्याची सेवा सुरू केली होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प मागणीमुळे ही सेवा बंद करण्यात आली. गेल्या काही महिन्यात पुणे विमानतळावरून नागरी उड्डाणांच्या संख्येत वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणांनादेखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे पुणे विमानतळ प्रशासनाने ही सशुल्क ‘हमाल सेवा’ पुन्हा सुरू केली आहे.
हमाल सेवेसाठी विमानतळ प्रशासनाने विशेष मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. विमानतळ परिसरातील एरोमाॅल किंवा बाहेरील रस्त्यापर्यंत एखादा प्रवासी उतरल्यानंतर त्याच्याकडील प्रवासी साहित्य, पिशव्या वाहून नेण्यासाठी हमाल सेवा सुरू करण्यात आली. नवीन टर्मिनल येथे मदतीसाठी हमाल सेवेची दोन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. – संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ