पुणे : हवाई प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि समृद्ध करण्याच्या अनोख्या उपक्रमांतर्गत, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील इमारतीत मोफत वाचनालय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे विमानाला विलंब होणार असल्यास प्रतीक्षा कालावधीत प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे.
या वाचनालयाची स्थापना टर्मिनलच्या प्रतीक्षागृहात करण्यात आली आहे. सध्या वाचनालयात विविध प्रकारच्या शंभराहून अधिक पुस्तके ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, आत्मचरित्रे आणि प्रादेशिक साहित्य यांचा समावेश आहे. प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा अनोखा उपक्रम असल्याची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
ढोके म्हणाले, ‘पुणे विमानतळावर पहिल्यांदाच मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमचा उद्देश प्रवाशांना प्रतीक्षेचा वेळ आरामदायक व उपयुक्त पद्धतीने घालवता यावा हा आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि अभिप्राय पाहून वाचनालयात पुस्तकांची भर घालण्यात येणार आहे. प्रवासाचा भाग म्हणून वाचन हा अनुभवही आनंददायी व्हावा, हीच यामागची छोटीशी संकल्पना आहे.’ हे वाचनालय सर्व प्रवाशांसाठी खुले असून, यासाठी कोणतीही नोंदणी किंवा कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवासी त्यांच्या पसंतीचे पुस्तक निवडून वाचू शकतात. या उपक्रमाला नियमित प्रवासी आणि पुस्तकप्रेमींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी स्वरांजली जोशी म्हणाल्या, ‘ही एक सुंदर कल्पना आहे. अनेकदा विमान उड्डाणांना विलंब होतो. त्यामुळे प्रतीक्षालयात केवळ प्रतीक्षेत बसण्यापेक्षा पुस्तक वाचता येते, ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे.’
दरम्यान, पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल सुरू झाल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडूनही विमानतळावरील सेवांचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश झाला आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये पुणे विमानतळावर सुधारणा होत असून प्रवाशांना याचा फायदा होत असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ गुणवत्ता सेवा परिषद (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल-एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी – एसीआय- एएसक्यू) यांनी गेल्या तीन महिन्यांतील सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एप्रिल ते जूनच्या तिमाही सर्वेक्षणात पुणे विमानतळातील सेवा गुणवत्तेत वाढ झाली असून, ते ५७ व्या स्थानी पोहोचले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ते ५९ व्या स्थानी होते. त्यामुळे प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.