पुणे : एका युवतीला रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेतील मांजरी दिसली. तिने त्या मांजरीला उपचारासाठी पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्याकडे नेले. तपासणीत त्या मांजरीच्या पाठीचा मणका मोडल्याचे निदर्शनास आले. डॉ. परदेशी यांचे उपचार आणि युवतीने घेतलेली काळजी यामुळे सहा महिन्यांनंतर ही मांजरी पुन्हा चालू लागली आहे. पुण्यातील या प्राणिप्रेमीचे नाव राधिका दीक्षित आहे.
राधिकाच्या घरासमोर रस्त्यावर एक मांजरी तिला नेहमी दिसायची. त्यामुळे राधिकाला तिचा लळा लागला होता आणि तिने मांजरीचे नामकरण बाली असे केले होते. राधिकाला जानेवारी महिन्यात बाली रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळली. ती बालीला स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये डॉ. नरेंद्र परदेशी यांच्याकडे घेऊन गेली. बालीच्या एक्स-रे तपासणीत तिचा मणका मोडल्याचे निदान झाले. डॉ. परदेशी यांनी ताबडतोब बालीला वेदना कमी करण्यासाठी आणि तिची प्रकृती सुधारण्यासाठी विटकोफोल इंजेक्शन आणि मेलोफ्लेक्स लिक्विडसह इतर औषधे देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर बालीची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली; परंतु त्यानंतरची काळजी घेणे अत्यंत गरजेचे होते. डॉ. परदेशी यांनी बालीला शस्त्रक्रियेच्या जागेवर चाटणे किंवा चावणे टाळण्यासाठी ताबडतोब एलिझाबेथ कॉलर वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, बालीने स्वतःच्याच डाव्या बाजूच्या मागच्या पायाला चावले. त्यामुळे तिच्या पायाची हाडे मोडली. त्यानंतर पुढील काही महिने जखमेची काळजी घेण्यात आली. तिने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. अखेर जून महिन्यात बाली पूर्ण बरी होऊन स्वत:च्या पायावर चालू लागली आहे.
मला अजूनही बाली सापडल्याचा पहिला दिवस आठवतो. ती रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडली होती. आज ती सोफ्यांवरून उड्या मारते आणि खेळण्यांसोबत खेळते.- राधिका दीक्षित
बालीचे हे प्रकरण आम्ही हाताळलेल्या सर्व प्रकरणांमध्ये वेगळे होते. वेळीच उपचार केल्याने ती बचावली. तिला वेदना होऊ नयेत, यासाठी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरसारख्या पर्यायी उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.– डॉ. नरेंद्र परदेशी