पुण्यात बुधवारी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. रस्त्यांचे नाले झाले. नाल्यांच्या नद्या. सोसायट्या. कॉलनीतील मोकळ्या जागांचे तलाव झाले. जिकडे पाहावे तिकडे फक्त पाणीच. राज्याची सांस्कृतिक राजधानी पावसाने वेठीस धरली. घरात पाणी येत असल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून शेजाऱ्यांकडेे आसरा शोधला… टांगेवाले कॉलनीतही असंच सुरू होतं. सगळे घरातून बाहेर पडत होते. त्यात घरात राहिलेलं कुत्र्याचं पिल्लू आणण्यासाठी रोहित गेला आणि काळाने डाव साधला.

पुण्यात मंगळवारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे पुण्यातील सहकारनगरमधील अरण्येश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात भिंत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहावीमध्ये शिक्षण घेणारा 14 वर्षाचा रोहित भारत आमले याचाही मृत्यू झाला. रोहितचे मामा तेजस अनावकर यांनी ही दुःख घटनेचा वृत्तांत सांगितला. “अरणेश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात आम्ही 20 वर्ष पासून राहत आहोत. आजवर आम्ही नाल्यातील पाणी वाहताना पाहिले आहे. पण काल रात्री 10 वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही मिनिटांत आमच्या वसाहतीमध्ये पाणी शिरले. आम्ही सर्व जण बाहेर पडलो. त्याच दरम्यान माझा भाचा रोहित आणि माझी आई बाहेर आले. तेवढ्यात रोहित मला म्हटला, ‘मामा घरात कुत्र्याचं पिल्लू राहिलं आहे, ते घेऊन येतो.’ मी त्याला जाऊ नकोस पाणी खूप वाढल्याचं सांगितलं. मामा अरे ‘आलोच असे म्हणून आता गेला आणि कुत्र्याचं पिल्लू बाहेर घेऊन येत असताना. त्याच्या अंगावर भिंत कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. रोहित लहान असताना त्याच्या आईचे निधन झाले आहे,’ हे सांगताना तेजस यांना अश्रू अनावर झाले.
पहा व्हिडीओ –

पुण्यातील सहकारनगर अरण्येश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पावसात भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत संतोष कदम, रोहित आमले, लक्ष्मी बाई शंकर पवार, जान्हवी जगन्नाथ सदावर आणि श्रीतेज जगन्नाथ सदावर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.