स्तनपानाचे बाळ आणि आईच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व याबाबत जनजागृतीपर विविध चर्चासत्रे, व्याख्याने आणि माता तसेच कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम यांच्या भरगच्च आयोजनाने शहरातील विविध रुग्णालयांनी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा आठवडा जगभरामध्ये स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. रविवारी या सप्ताहाचा समारोप झाला.

खराडी येथील मणिपाल रुग्णालयाने नवजात मातांना स्तनपानासाठी मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी परिचारिकांना प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. रुग्णालयाच्या स्तनपान सल्लागार डॉ. रेबेका गोसावी म्हणाल्या, स्तनपानाचे योग्य तंत्र पहिल्यांदाच आई होणाऱ्या माहिती नसते. परिणामी, फार कमी तान्ह्या बाळांना योग्य प्रकारे स्तनपान केले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या प्राथमिक वाढीवर होतो. म्हणून परिचारिकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करुन नवीन मातांसाठी एक मदत गट तयार करण्याचे काम करत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ‘मॉम स्टोरी’ या केंद्रातर्फे विशेष उपक्रमाद्वारे आठवडाभर मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ. सुप्रिया पुराणिक म्हणाल्या की, स्तनपानाचे महत्त्व आणि बाळाच्या आरोग्यासाठी दीर्घकाळपर्यंत होणारे त्याचे फायदे याबाबत सातत्याने बोलले जाण्याची गरज आहे. स्तनपान आई आणि मूल या दोघांसाठीही फायदेशीर आहे. नवजात बाळाला रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या मिळवून देण्यासाठी मातेचे दूध हे उत्तम औषध असते. आईच्या दुधात प्रथिने, कर्बोदके, चरबी, खनिजे, जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक असतात. ज्या मुलांना स्तनपान केले जाते, अशा बालकांना पुढील आयुष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, सर्दी, खोकला, अतिसार यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. स्तनपान करताना स्त्रवणाऱ्या हार्मोन्समुळे गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि अशक्तपणाची जोखीम कमी होते. स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी असते, असेही डॅा. पुराणिक यांनी स्पष्ट केले.