पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेतील खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयक बदनामीकारक मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात अशा प्रकारचे फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या घटवाई यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दिला आहे. डॉ. कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलावे. रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक शहरात लावण्यात आले आहेत.

लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परशुराम हिंदू सेवा संघाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघाकडून डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांना देण्यात आले आहे. या वेळी परशुराम हिंदू सेवा संघाचे विश्वजीत देशपांडे, आम्ही सारे ब्राह्मण संस्थेचे भालचंद्र कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती केंद्राचे मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी, मंदार रेडे, मनोज तारे, ईशानी जोशी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्तांना अहवाल पाठविण्याच्या सूचना

मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक लावल्या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी. याबाबतचा अहवाल तत्काळ पाठविण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केली आहे.