पिंपरी- चिंचवड: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे. बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हागवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुळशीतील भुकूम येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाचच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्या केली. काही वेळानंतर पती शशांक हगवणे यांनी दरवाजा ठोठावला. पत्नीने दरवाजा न उघडल्याने शशांक यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर ही गंभीर घटना समोर आली. शशांक यांनी तातडीने पत्नीला खासगी रुग्णालयात नेलं. आधी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वैष्णवीला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आलं. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे काही व्रण आढळले आहेत. याप्रकरणी बावधन पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. वैष्णवी शशांक हगवणे यांना नऊ महिन्याचा मुलगा आहे.
बावधन पोलीस ठाण्यात पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, ननंद करिष्मा राजेंद्र हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अधिक तपास बावधन पोलीस करत आहेत.