पुणे : शहर आणि परिसरात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. शिवाजीनगरमध्ये ९.७ तर एनडीएत ८.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहर आणि परिसरात हवेतील गारठा महिनाअखेर कायम राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी सायंकाळी शहरात थंड, बोचरे वारे वाहत होते. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन हवेत गारठा वाढण्याचा अंदाज होता. त्यानुसार आज, बुधवारी सकाळी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. शहरात एनडीए परिसरात ८.२, हवेलीत ८.७ आणि शिवाजीनगरमध्ये ९.७ आणि पाषाणमध्ये १०.१ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. दुपारी एक-दीड तास कडक ऊन पडल्यानंतर पुन्हा हवेत गारठा जाणवू लागला होता.

हेही वाचा >>>‘उपराकार’ लक्ष्मण माने यांची टीका: म्हणाले, ‘मनोज जरांगे हे मनूवादी…’

शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या विविध भागांत किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. माळीणमध्ये (आंबेगाव) ८.२, राजगुरुनगरमध्ये ९.७, बारामतीत ९.८, निमगिरी (जुन्नर) ९.९ आणि इंदापुरात १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातही दिवसा बोचरी थंडी जाणवत होती.दरम्यान, शहराच्या काही भागांत किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसवर आले असले तरीही वडगावशेरीत १७.५, मगरपट्ट्यात १६.८, चिंचवडमध्ये १५.५, कोरेगाव पार्कमध्ये १४.४ इतक्या किमान तापमानाची नोद झाली आहे.