पुणे : ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा किंवा केंद्रशासित करण्याचा विचार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ चेतवण्याचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरी गीतांनी केले,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या तीन खंडांचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, सुनील कांबळे, हेमंत रासने, अमित गोरखे, अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर या वेळी उपस्थित होते.

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरी बाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले असून, मुंबई विभक्त करण्याचा डाव म्हणून पाडला गेला,’ असे एकनाथ शिंदे यांनी मनोगतामध्ये सांगितले.

फडणवीस म्हणाले, ‘अवघा दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर हजारो जण पीएच.डी. करतात. त्यामुळे अण्णा भाऊ हे चालते-बोलते विद्यापीठ आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मुंबईतील चिरागनगर येथील घराचा प्रस्तावित आराखडा तयार असून, लवकरच तेथे सुंदर स्मारक साकारण्यात येईल. तर, अण्णा भाऊंचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, तेथे जागेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. याशिवाय अण्णा भाऊ साठे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही तयार करू.’

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्य सरकार आठवडाभरात अध्यादेश काढेल,’ अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात करुणा, क्रांती, संवेदना, काव्य आणि वैश्विकता आहे. समाजाची एकजूट करणाऱ्या त्यांच्या साहित्याचा जगभरातील २२ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘उपवर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात’

‘अनुसूचित जातींमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांना न्याय मिळावा, यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या संदर्भात लवकरच याबाबत घोषणा केली जाईल,’ असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.