स्वारगेट परिसरातील नेहरू स्टेडियममध्ये सुरु असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या सरावात आवाजाची मर्यादा पाळली जात नसल्याबाबत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या पथकाने सरावासाठी मैदानाच्या परिसरात अनधिकृत शेड उभारले असून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विविध खेळांच्या कार्यालयांकडून आक्षेप –

नदीपात्रातील रस्त्याबरोबरच मोकळ्या जागांवर ढोल पथकांचा सराव सुरू झाला असतानाच ढोल-ताशा पथकांकडून स्वारगेट परिसरातील नेहरू स्टेडियम मैदानातही दणदणाट सुरू झाला आहे. त्यामुळे सरावाच्या परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्याबाबत मैदान परिसरात असलेल्या विविध खेळांच्या कार्यालयांकडून आक्षेप घेण्यात आला होता.

कार्यालयात कामकाज करण्यास अडथळे –

पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आणि कबड्डी संघटनेच्या कार्यालयाचे कामकाज रात्रीपर्यंत सुरू असते. या कालावधीत नागरिकांची कार्यालयात ये जा सुरू असते. ढोल-ताशा पथकाचा सराव या कालावधीत सुरू असल्याने पार्किंगसह अन्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छतागृहाच्या दरवाज्यात पथकाकडून अनधिकृत शेड उभारण्यात आले आहे. ढोल-ताशाच्या आवाजामुळे कार्यालयात कामकाज करण्यास अडथळे येत आहेत, असे या दोन संघटनांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च न्यायालयाने काय दिला आहे आदेश? –

नेहरू स्टेडियममधील कबड्डी मैदानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जिल्हा क्रिकेट, कबड्डी खेळाची कार्यालये आहेत. तसेच अण्णा भाऊ साठे वाचनालयही आहे. या संघटनांची कार्यालये सकाळ आणि संध्याकाळ सुरू असतात. या जागेवर पूर्वी रोप वेचे खांब उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याविरोधात उच्च न्यायालयाने केवळ खेळासाठी आणि आतील जागा क्रिकेटसाठी वापरण्यात यावी, असा आदेश दिला आहे.