आपल्या राज्याने केंद्राला अनेक उपक्रम दिले आहेत.पण केंद्र सरकार आजकाल तुम्ही पाहत असाल तर राज्य आणि केंद्रात दुफळी निर्माण करण्याचे काम करीत आहे. आपल्या संविधानाला तोडण्याचा प्रयत्न होत आहे, असं म्हणत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पुण्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुण्यातील गुडलक चौक येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘लडकी हूं लड सकती हूं’ या कार्यक्रमास १२५ दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे,आमदार संग्राम थोपटे,माजी गृहराज्यमंत्री शहर अध्यक्ष रमेश बागवे,पुणे शहर महिला अध्यक्षा पूजा आनंद,संगीता तिवारी उपस्थित होते. तर यावेळी तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, येत्या ८ मार्चला महाविकास आघाडी सरकार आणि महिला बालकल्याण विभाग नवीन महिला धोरण आणत आहे. काही जणांसाठी केवळ बोलण्यासाठी महिला महत्वाच्या आहेत.पण ज्यावेळी द्यायची वेळ येते ना,होतो का नाही अन्याय? असे म्हणताच उपस्थित तरुणींनीही सहमती दर्शवली. तसेच केंद्राने जो काही गोंधळ घातला आहे. त्या गोंधळावर मात करीत ४० टक्के आरक्षण महिलांसाठी आणलेच पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
तसेच ठाकूर पुढे म्हणाल्या की,संसाराचा गाडा पुढे नेण्याचं काम आणि समाजाला घडविण्याचं काम महिला करीत आहे. तिच्यावर विश्वास टाकण्याचं काम प्रियांका गांधी यांनी केले आहे. महिला धोरणावेळी सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला होता. तर त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार असताना,पहिले महिला धोरण अवलंबले असल्याचे त्यांनी सांगितले.