पुणे : काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांंच्या तयारीसाठी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बैठका घेत आढावा घेतला; पण या आढावा बैठकाच आता वादाला कारणीभूत ठरल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांंच्यासमोर आपला जिल्हा किती कार्यक्षम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला. पुणे जिल्ह्याला गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष नसताना आणि पुणे शहराला अद्याप पूर्णवेळ अध्यक्ष नसतानाही आढावा बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ब्लॉकनिहाय बैठका झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून सपकाळ आणि चेन्नीथला यांना देण्यात आली. त्यावर ‘ब्लॉकनिहाय बैठका केव्हा झाल्या?’ असा प्रश्न बैठकांनंतर काही पदाधिकारी आणि इच्छुकांनी केल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा आणि आगामी काळातील व्यूहरचना आखण्यासाठी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा बैठका काँग्रेस भवनमध्ये घेण्यात आल्या. या आढावा बैठकांसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सहप्रभारी बी. एम.संदीप, पुणे जिल्ह्याचे निरीक्षक, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील आदी प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशी तयारी करण्यात आली आहे, याची विचारणा चेन्नीथला यांंच्याकडून बैठकीत करण्यात येत होती. पुणे शहरातील तयारीची माहिती देताना एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ब्लॉकनिहाय बैठका घेतल्याची माहिती दिली आणि उपस्थित पदाधिकारी अवाक झाले. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना, अद्याप बैठका झाल्या नसतानाही प्रभारी आणि निरीक्षक यांना ही माहिती देण्यात आली. बैठकीचा फार्स झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या काही पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी ‘ब्लॉकनिहाय बैठका केव्हा झाल्या?’ असा प्रश्न वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना केला. त्यावर ‘आपण नंतर बोलू ’ असे सांगून उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे उपस्थित काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  आढावा बैठकांचा हा फार्स झाल्यानंतर आता न झालेल्या ब्लॉकनिहाय बैठका या काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कारणीभूत ठरल्या आहेत.

बैठका घेतल्या कोणी?

शहर काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. त्यामुळे अद्याप पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्यात आलेला नाही. अनेकदा एका गटाने कार्यक्रम घेतल्यावर दुसऱ्या गटातील कोणीही हजर रहात नाही. त्यामुळे ‘बैठका घेतल्या कोणी?’ यावरून शहर काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. 

जिल्हाध्यक्षपद दोन महिने रिक्त  

पुरंदरचे माजी आमदार, संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे १२ जुलै रोजी त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. तरीही पदाधिकाऱ्यांंकडून निवडणुकांसाठी बैठका घेतल्याची माहिती आढावा बैठकीत वरिष्ठांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

चेन्नीथला यांच्याभोवती पदाधिकाऱ्यांचा वेढा  

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे निवडणुकीच्यादृष्टीने तयारीची माहिती आढावा बैठकांमध्ये घेत होते. मात्र, बैठक संपल्यावर त्यांचा इतरांशी संवाद होऊ नये, याची खबरदारी काही वरिष्ठ पदाधिकारी घेत होते. त्यासाठी जिल्हानिहाय बैठक संपल्यावर काही वरिष्ठ पदाधिकारी हे चेन्नीथला यांच्याभोवती उभे रहात असल्याने संवाद न साधता इच्छुकांना परत जावे लागले. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे, हे गुलदस्त्यातच राहिल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.