पुणे : नवी पेठेतील लोकमान्यनगर, तसेच वाघोली भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग आणि वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोमवारी (२ जून) दुपारी सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातून ऐवज चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत वाघोलीतील केसनंद भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शनिवारी (३१ मे) सदनिका बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेला. वाघोली पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.