पुणे :  वानवडी भागात  झालेल्या खून प्रकरणात पोलिसांना दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. कर्नाटकमधील विजापूर येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सिकंदर आयुब शेख उर्फ सय्यद (वय ३४), जाकीर कादीर सय्यद (वय ४२) आणि अमिर अकील सय्यद (वय २३, तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी २०२३ मध्ये एकाचा खून केला होता. खून प्रकरणात आरोपी पसार झाले होते. ते ओळख  लपवून राहत होते. खून प्रकरणातील  फिर्यादीला आरोपींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जिवे मारण्याची धमकी दिली होती.

पसार झालेले आरोपी कर्नाटकातील विजापूर भागात वास्तव्यास असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना कर्नाटकातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्सनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक प्रमोद खरात, राजस शेख, प्रशांत कर्णवर , नासेर देशमुख आणि पथकाने ही कारवाई केली.

खुनाचा प्रयत्न प्रकरणातील आरोपी अटकेत

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीनावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. गुन्हा घडल्यानंतर आरोपी महिनाभर पसार होता. साजिद उर्फ बाबा नजीर लाला खान (वय २३, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेेल्याचे नाव आहे. आरोपी खान, साथीदार गौरव गणेश तेलंगी, अलोक सचिन अलगुडे यांनी गेल्या महिन्यात २ जुलै रोजी शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीनावर कोयत्याने वार केले होते.

अल्पवयीनाने वार हातावर झेलला होता. अल्पवयीनाच्या पंजा तुटला होता. या प्रकरणी आरोपी शिवाजीनगर पोलिसांनी तेलंगी आणि अलगुडे यांना अटक करण्यात आली होती. आरोपी खान हा पसार झाला होता. तो भवानी पेठेतील अंगारशाह तकिया परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक बर्गे, पोलीस कर्मचारी विनोद शिंदे, विठ्ठल साळुंखे, मयूर भाेसले, अमित जगदाळे, निलेश साबळे, उमेश मठपती यांनी ही कामगिरी केली.