पुणे : पार्टी साजरी करणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी रस्त्यावर गोंधळ घालून दारूच्या बाटल्या फोडल्याची घटना मुंढवा परिसरात रविवारी रात्री घडली.या घटनेनंतर या भागातील रहिवाशांनी थेट हाॅटेल मालकाला विचारला. हाॅटेल मालक आणि रहिवाशांमध्ये वाद झाल्याने रविवारी रात्री मुंढवा परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी तेथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुंढवा भागात नव्याने एक पब आणि हॉटेल सुरू झाले आहे. रविवारी ( १७ ऑगस्ट) हाॅटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास मद्यधुंद तरुणांनी परिसरात गोंधळ घातला. रस्त्यात दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. या वेळी स्थानिक रहिवाशांनी त्यांना जाब विचारला. तेव्हा मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी रहिवाशांना शिवीगाळ केली, असा आरोप रहिवाशांनी केला. या घटनेनंतर रहिवाशांनी हाॅटेलमध्ये धाव घेतली आणि मालकाला जाब विचारला. बाचाबाची झाल्याने हाॅटेलच्या परिसरात तणाव निर्माण झाले. हाणामारीपर्यंत वाद पोहोचल्याने त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसानी हाॅटेलमालक आणि रहिवाशांची बाजू ऐकून घेतली. हाॅटेलमालकाला पाोलिसांनी सूचना दिल्या. हाॅटेलच्या परिसरात गैरप्रकार झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशा सूचना हाॅटेलमालकाला पोलिसांनी दिल्या आहेत.

कल्याणीनगरमधील पबविरुद्ध गुन्हा दाखल

स्वातंत्र्यदिनी मद्य विक्रीस बंदी असताना कल्याणीनगर भागातील एक पबमध्ये मद्य विक्री करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी येरवडा पाेलिसांनी संबंधित पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. मद्य विक्री बंदीचा आदेश धुडकाविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापूर्वी संबंधित पबविरुद्ध पोलीस, तसेच राज्य उत्पदान शुल्क विभागाने कारवाई केली होती.

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी मे महिन्यात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला धडक दिली होती. अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कल्याणीनगर भागतील रहिवाशांनी आंदोलन करुन जाब विचारला होता. कल्याणीनगर, मुंढवा, येरवडा भागातील पब, हाॅटेलच्या परिसरातील गैरप्रकांराबाबत यापूर्वी स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पब, हाॅटेल, तसेच बारमालकांसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली. नियमावलीचे पालन न केल्यास कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेश धुडकाविणाऱ्या संबंधित हाॅटेल, पबचालकांविरुद्ध पोलिसांनी यापूर्वी गुन्हे दाखल केले होते.