वेगवेगळय़ा गुन्हय़ात आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मौल्यवान ऐवज, वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात आणली जातात, तसेच बेवारस सापडलेल्या वस्तू पोलिसांकडून मुद्देमाल कक्षात जमा केल्या जातात. मुद्देमाल कक्ष हा पोलीस ठाण्यातील महत्त्वाचा भाग असतो. गंभीर गुन्हय़ातील आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीसाठी लागणारे पुरावे पोलिसांकडून काळजीपूर्वक मुद्देमाल कक्षात ठेवण्यात येतात. सुनावणी दरम्यान महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर करावे लागतात. मुद्देमाल कक्षाची जबाबदारी पोलीस ठाण्यातील एका पोलिसांकडे सोपविण्यात येते. पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई प्रकाश भोसले याने मुद्देमाल कक्षातील १ लाख ६८ हजारांचा अपहार केल्याची घटना वीस वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून पोलीस शिपाई भोसले पसार असून त्याला शोधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले, मात्र वीस वर्षांनंतरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

‘कुंपणच शेत खाते’ या म्हणीचा प्रत्यय पोलीस दलाला यापूर्वीही आला आहे. मध्यंतरी एका कुख्यात गुंडाला पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी पिंपरी न्यायालयातून पळून जाण्यास मदत केली होती. त्या पोलिसांनी गुंड आणि त्याचे साथीदार न्यायालयीन खटल्याच्या कामकाजावरून परत येत असताना कात्रज घाटातून पसार झाल्याची खोटी तक्रार दिली होती. तपासात पोलिसांनी गुंडाकडून चिरीमिरी घेऊन त्याला पळून जाण्यास मदत केल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी गुंडासह त्या पोलिसांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई केली होती. लोहगाव भागात हिंदुस्थान पेट्रोलियमची वाहिनी फोडून पेट्रोल चोरीच्या प्रकरणात पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह चोरटय़ांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. एकंदरच अशा प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलाची नाचक्की तर होतेच, पण पोलिसांच्या विश्वासार्हतेबद्दल काही प्रश्न उपस्थित होतात.  पुणे लोहमार्ग पोलीस दलात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई प्रकाश विनायक भोसले मूळचा नाशिक जिल्हय़ातील निफाडचा रहिवासी. पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात तो मुद्देमाल कक्षात नेमणुकीस होता. मुद्देमाल कक्षात तो कारकून होता. त्यामुळे मुद्देमाल कक्षातील सर्व महत्त्वाचा ऐवज सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. रेल्वे स्थानकाच्या परिसरात सापडलेला बेवारस ऐवज, चोरटय़ांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज मुद्देमाल कक्षात ठेवण्यात येतो. बऱ्याचदा ऐवज सापडल्यानंतर तक्रारदार तक्रार देण्यास पुढे येत नाही. अशा तक्रारदारांचा शोध घेणे किंवा ज्यांनी तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीची पडताळणी करून मौल्यवान ऐवज न्यायालयाच्या आदेशाने परत करण्याची जबाबदारी भोसलेवर होती. १९९८ मध्ये भोसले मुद्देमाल कक्षातील १ लाख ६८ हजारांचा ऐवज घेऊन पसार झाला. यात दागिन्यांचा समावेश होता. भोसलेने ऐवज लांबविण्याची घटना उघडकीस आल्यानंतर लोहमार्ग पोलीस हादरून गेले होते. त्याच्याविरुद्ध पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर भोसलेचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र तो सापडला नाही. भोसलेला पकडण्यासाठी लोहमार्ग पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मूळ गावी जाऊन आले. त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली, मात्र त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. या बाबत लोहमार्ग पोलीस दलातील एक अधिकारी म्हणाला, भोसलेचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. तो कुठे आहे, याची माहितीदेखील त्याच्या नातेवाइकांना नाही. ही घटना १९९८ मध्ये घडली होती. त्या वेळी एवढी तांत्रिक साधने उपलब्ध नव्हती, त्यामुळे तांत्रिक तपास करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. खबरे, नातेवाइकांची मदत घेऊन भोसलेला पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र गेली वीस वर्षे भोसले पोलिसांना सापडला नाही. भोसले कुठे आहे, याची माहिती त्याच्या नातेवाइकांनादेखील नाही.

लोहमार्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाक डे (सीआयडी) सोपविण्यात आला होता. सीआयडीच्या पथकाकडून त्याला पकडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले, मात्र सीआयडीचे प्रयत्न देखील निष्फळ ठरले. भोसलेला न्यायालयाने २००५ मध्ये फरारी घोषित केले. त्याच्या अस्तित्वाविषयीदेखील शंका उपस्थित केल्या जात आहेत. फरारी गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात, मात्र  भोसलेचा ठावठिकाणा गेली वीस वर्षे पोलिसांना लागला नाही, हे वास्तव आहे.

rahul.khaladkar@expressindia.com